परिसराला सोमवारी (दि.२३) रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला होता. कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने पहाटेपासून या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शहर परिसरात महिनाभरात दुसऱ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली असून सीना नदीलाही दुसऱ्यांदा पूर आला.
शहर परिसरात गणेशोत्सवानंतर पुन्हा अधून मधून पाऊस सुरु आहे. शुक्रवारी (दि.२०) रात्री जोरदार पावसाने
हजेरी लावली होती. त्यानंतर सोमवारी (दि.२३) सकाळीच काही भागात पाऊस झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पण सायंकाळनंतर विविध भागात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस सुरू झाला. नगर शहर परीसराबरोबरच तालुक्यात अनेक भागात या पावसाने जोरदार हजेरी लावली. शहर परिसरात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रात्रभर अधून-मधून पावसाचा जोर वाढत होता
नागापूर तर ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने आणि सावेडी परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. या पुरामुळे कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने या रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. महिनाभरापूर्वी दि. २३ ऑगस्ट रोजी रात्रीही शहर परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सीना नदीला या वर्षीचा पहिला पूर आला होता. सोमवारी बरोबर एक महिन्याने पुन्हा अतिवृष्टी झाली आणि सीना नदीला दुसऱ्यांदा पूर आला.
या मुसळधार पावसामुळे शहर परिसरातील नागापूर आणि नगर तालुक्यातील चास या २ मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नागापूर मध्ये ७३.५ मिमी तर चास मंडलात तब्बल १०२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या शिवाय सावेडी मध्ये ५७.५ मिमी, नालेगाव २३ मिमी, कापूरवाडी ४१.८ मिमी, केडगाव ३.८ मिमी, भिंगार २७.३ मिमी, , वाळकी ४५.३ मिमी, रुईछ्तीसी १० मिमी, नेप्ती ४५ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.
नगर शहर परीसरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी रात्री कुठे मुसळधार तर तुरळक पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे नगर, पारनेर व राहुरी या ३ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये नगर ४०.५ मिमी, पारनेर ६१.२ मिमी, राहरी ४८.६ मिमी, श्रीगोंदा २७.१ मिमी, कर्जत ६ मिमी, जामखेड ०.५ मिमी, शेवगाव २.४ मिमी, पाथर्डी १३ मिमी, नेवासा ६. १ मिमी, संगमनेर १७.१ मिमी, अकोले १०.२ मिमी, कोपरगाव ११ मिमी, श्रीरामपूर २२.६ मिमी, राहाता १९.७ मिमी असा जिल्ह्यात सरासरी २३.८ मिमी पाऊस झाला आहे.