शहरातील चौक व रस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट

0
63
oplus_32

नगर – मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोयात आले आहे. मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेणे गरजेचे आहे. शहरातील बंगाल चौकी, गंज बाजार, माळीवाडा, वाडिया पार्क, लालटाकी, झेंडीगेट, अमरधाम, गाडगीळ पटांगण भाजी बाजार, तसेच सावेडी उपनगर मधील पाइपलाइन हडको, वाणीनगर, एकवीरा चौक भाजीबाजार, यशोदानगर भाजी बाजार ग्राउंड, श्रीराम चौक, वसंत टेकडी भागातील रस्त्यांवरील पाळीव मोकाट जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेकडे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही. शहरातील महामार्गावरील आणि वेगवेगळ्या वस्त्यांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचा सुळसुळाट असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील विविध भागात जनावरांचा कळप नेहमीच रस्त्यांवर उभे किंवा बसलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसात मोठ़या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवर येण्याबाबत अनेक मतप्रवाह आहे. काहींच्या मते गोठ़यात पावसाळ्यात चिखल आणि माश्यांचा त्रास होत असल्याने ते रस्त्यांवर ठाण मांडतात. आठवडी व रस्त्यावरील भाजी बाजार, फुल बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. परंतु मनपाच्या कोंडवाडा विभागाच्या कर्मचार्‍यांना त्यांचा बंदोबस्त करता आलेला नाही. याचे परिणाम वाहनचालकांना भोगावे लागत आहेत तसेच परिसरात अस्वच्छता ही पसरते तरी या पाळीव मोकाट पशुमालकांवर दंडात्मक तसेच भारतीय दंडसंहितेनुसार कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत