नगर – पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुले एटीएम बनलीत. केवळ पॅकेजच्या मागे लागल्याने ही पिढी संस्कार हरवून बसलीय. ज्ञान कुठेही मिळू शकते पण संस्कार करावेच लागतात. ग्रीन स्पार्क आणि ससेस अकादमी हे काम करीत आहे. पालकांनीही त्यांची जबाबदारी ओळखली पाहिजे, असे प्रतिपादन साहित्यिक, व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी केले. संस्काराअभावी मुलांमध्ये भावनिकतेची मोठी पोकळी निर्माण झालीय. ही पिढी संवेदनाच हरवून बसलीय. या पार्श्वभूमीवर प्रबोधन करण्याच्या हेतूने ग्रीन स्पार्क प्री स्कूल आणि ससेस अकादमीच्या वतीने मुले घडवतानाची धडपड या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. कळमकर बोलत होते. आपल्या नर्मविनोदी शैलीत त्यांनी पालकांना मार्गदर्शन करतानाच कानटोचणीही केली. प्रारंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्कार योगिनी गाडळकर यांनी केला. डॉ. कळमकर म्हणाले, पालक आणि मुलांमधील संवाद हरवत चालला आहे. नोकरी किंवा उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने तो सतत बाहेर असतो. मुलांचे पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यासही त्याला वेळ नाही. हा केवळ बाप-लेकातील संवाद तुटलेला नाही तर पिढीत अंतर पडत आहे. ही दरीच सामाजिक स्वास्थ्य बिघडवित आहे. असे ते म्हणाले. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधीक्षक महावीर धोदाड यांनी मनोगत व्यक्त केले. दुर्वा पाटील यांनी औक्षण केले. सूत्रसंचालन ऋषिकेश पाटील यांनी केले. आभार पूजा गांगर्डे यांनी मानले.
जबाबदारी मध्यमवर्गीयांवरच…
मुलगा हा वडिलांचे निरीक्षण करीत मोठा होतो. आपले वडील आजोबाय्आजींसोबत कसे वागतात, हे तो पाहत असतो. आपण त्यांना काठी काढली तर तो भविष्यात आपल्याला पिस्तूल काढून सव्याज परतफेड करील. श्रीमंतांना समाजाचे देणे-घेणे नाही. आणि गरिबांचा त्याच्या पोटाची खळगी भरण्यातच वेळ जातो. समाजाची सर्व जबाबदारी मध्यमवर्गियांवरच आहे. त्यामुळे आपण सर्वांनी हे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे, असेही निरीक्षण डॉ. कळमकर यांनी नोंदवले.