हातात कोयते घेवून युवकांकडून दहशत

0
82

नगरमधील कायनेटिक चौकातील प्रकार सिसिटीव्हीत कैद; पोलिसांकडून तिघांना अटक

नगर – नगर शहरातील कायनेटिक चौक परिसरात काही गुंडांनी शुक्रवारी (दि.१२) पहाटे हातात कोयते घेवून आरडाओरडा करत चांगलाच धुडगूस घातला. या परिसरातील चहाच्या टपर्‍या पाडून टपरी मालकांचे मोठे नुकसान केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून हा व्हिडीओ शहरात व्हायरल झाला. यातील तिघांना कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. चंद्रकांत अशोक सातपुते (वय २९), प्रकाश राजू लोखंडे (वय ३०), अमोल किशोर खोमणे (सर्व रा. कोठला, अहमदनगर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत.

या तिघांनी शुक्रवारी (दि.१२) पहाटे १.३० च्या सुमारास दुचाकी वरून कायनेटिक चौक परिसरात जात तेथे हातात कोयते घेवून आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. तेथे असलेल्या काही चहाच्या टपर्‍या पाडत धुडगूस घातला. त्यानंतर तेथून निघून गेले. पुन्हा २.२४ वाजण्याच्या सुमारास ते या परिसरात आले. आणि आणखी एक चहाची टपरी पाडून मोडतोड करण्याच्या उद्देशाने त्या टपरीवर कोयत्याने मारले. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. सकाळी टपरी चालक टपर्‍या सुरु करण्यासाठी आल्यावर त्यांना टपर्‍या पाडण्यात आल्याचे दिसून आले.

काहींनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता कोयता गँगने घातलेला धूडगुस समोर आला. कोयता गँगचा हा व्हिडीओ शहरात व्हायरल झाला. कोतवाली पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून तपास सुरु केला. हे तिघे जण पुन्हा कायनेटिक चौक परिसरात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ तिकडे धाव घेत या तिघांना कायनेटिक चौक ते रेल्वे स्टेशन कडे जाणार्‍या रोडवर पकडले. त्यांच्या कडून ३ कोयते जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पो.हे.कॉ. योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादी वरून चंद्रकांत सातपुते व प्रकाश राजू लोखंडे या दोघांवर तर पो.कॉ. सुरज कदम यांच्या फिर्यादी वरून अमोल खोमणे याच्या विरुद्ध भारतीय शस्र कायद्याचे कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.