प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा उपक्रम
नगर – प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने विळद येथील गवळीवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रुपच्या वतीने सुरु असलेल्या अभियानातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी दादीय्नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयासच्या संस्थापिका अलकाताई मुंदडा, शालेय शिक्षिका अर्चना बोरुडे, उपाध्यक्ष उषा सोनी, सावेडी ग्रुपचे उपाध्यक्ष कविता दरंदले, सचिव ज्योत्स्ना कुलकर्णी, खजिनदार मेघना मुनोत, लीला अग्रवाल, रजनी भंडारी, नीलिमा पवार, लता डेंगळे, आशा कटारे, छाया राजपूत, मायाताई कोल्हे, अनिता काळे, वंदना गोसावी, राखी जाधव, उज्वला बोगावत, उषा सोनटक्के, आशा गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरुडे, शालेय समिती अध्यक्ष कोंडाजी होडगर आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पायी दिंडी काढून सर्वांचे लक्ष वेधले. वारकर्यांच्या वेशभूषेत चिमुकले उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडीत विठ्ठल-रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या वेशभुषेत विद्यार्थी अवतरले. जय हरी विठ्ठलचा… गजर करत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महिला व विद्यार्थ्यांनी फुगड्यांचा फेर धरला होता. छाया राजपूत म्हणाल्या, शिक्षणाने परिस्थिती बदलणार असून, सर्व घटकातील विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षित होण्याची गरज आहे. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा मंदिर असून, शिक्षक आणि आई-वडील हे आपले गुरु असतात. ज्ञान, संस्कार आणि सुसंस्कृत संपन्न विद्यार्थी घडल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मायाताई कोल्हे म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळेत सर्वसामान्य वर्गातील मुले शिक्षण घेत असून, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. बिकट परिस्थितीवर मात करुन पुढे आलेली मुले जीवनात यशस्वी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंदना गोसावी म्हणाल्या, मुलांनी शिक्षणात यश मिळवले, तर शिक्षकांना देखील त्यांचा गौरव वाटतो. समाजाचा विकास साधण्यासाठी शिक्षण हा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हासू फुलले होते.