महापालिका आयुक्तांनी पदभार घेताच ‘कचरा संकलन यंत्रणे’ची केली पाहणी

0
94

सक्कर चौक ते दिल्लीगेट वेशीपर्यंत पायी फिरुन घेतला कामाचा आढावा, कायनेटिक चौकातील गार्बेज कलेशन सेंटर अन्यत्र हलविणार

नगर – महानगरपालिकेचे आयुत यशवंत डांगे यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी नगर शहरातील कचरा संकलन यंत्रणेची पाहणी केली. आयुक्त अचानक सकाळी सकाळी रस्त्यावर आल्याने कर्मचार्‍यांची धांदल उडाली. साफसफाई करणारे कामगार, कचरा संकलन करणार्‍या घंटागाड्यांवरील चालक आणि स्वच्छता निरीक्षकांची त्यांनी झाडाझडती घेतली. शहर सुरू होण्याच्या आत स्वच्छ झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्वांची कानउघडणी केली. नगर शहर स्वच्छ, सुंदर दिसले पाहिजे, यासाठी आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रक त्यासाठी अधिक मजबूत करणार आहोत. कचरा संकलन सकाळ, दुपार, संध्याकाळ घंटागाड्याद्वारे होईलच, सोबत रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल. अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिल्या आहेत. सक्कर चौकापासून त्यांनी प्रभातफेरीला सुरुवात केली. त्या अगोदर कायनेटिक चौकातील गार्बेज कलेशन सेंटरची पाहणी केली. सीना नदी घाट सुशोभीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील गार्बेज कलेशन सेंटर दुसरीकडे हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे माळीवाडा वेस, माणिक चौक भिंगारवाला चौक, तेलीखुंट, नेतासुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट वेस या मार्गावरून त्यांनी अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत पायी फिरून ठिकठिकाणी साफ सफाईबाबत निर्देश दिले. रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर दुकाने उघडतात आणि मग दुकानदार झाडलोट करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात, याबाबत संबंधितांना समज देऊन वारंवार अशा गोष्टी घडल्यास तात्काळ कारवाई करा, त्यांना दंड आकारणी करा असे आदेश देण्यात आले आहेत. माळीवाडा वेशीजवळील कचराकुंडी बंद करून तो कचरा घंटागाडीद्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली. २ वर्षांपूर्वी जसे स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करून दाखवले त्याप्रमाणे यावर्षी देखील या अभियानात नगर शहर कुठेच कमी पडणार नाही याचा आपण दृढनिश्चय केलेला असून यावर्षीही मानांकन मिळवून नगर शहराला भरीव असा निधी उपलब्ध करून देऊ, असे डांगे यांनी म्हटले आहे.