नगर- नगर शहरातील अनेक ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे केल्याने सध्याच्या पावसाळी परिस्थितीत नागरिकांच्या घरात, दुकानांमध्ये पावसाचे पाणी, ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने मनपाने तातडीने या ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढावेत. अन्यथा मनसेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आला. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे, उपजिल्हाध्यक्ष मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव डॉ.संतोष साळवे, उपशहराध्यक्ष तुषार हिरवे, उपशहराध्यक्ष संकेत व्यवहारे, उपशहराध्यक्ष किरण रोकडे, उपशहर अध्यक्ष संदीप चौधरी, वाहतूक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, प्रमोद ठाकूर आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नगर शहर व उपनगरात मिळून लहान मोठे असे एकूण ४१ ओढे, नाले आहेत. बहुतांश नाल्यावर अतिक्रमण झाले असून, काही ठिकाणी नाल्यांचे प्रवाह बंद करून त्यावर बांधकाम करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी पाईप टाकून प्रवाह बंदिस्त केले आहेत. पक्की बांधकामे झाल्याने अनेक ठिकाणी प्रवाह अरुंद झाले आहेत व यामुळे पावसाळ्यात ओढे, नाल्यांमधून नैसर्गिकरीत्या पाणी वाहून जात नसल्याने हे पाणी रस्त्यावर तसेच नागरिकांच्या घरात शिरते. जोरदार पाऊस झाला तर शहरातील बहुतांशी घरात पाणी जाण्याची शयता निर्माण झाली आहे.
ओढ्यामधील हे अतिक्रमण हटवावे, यासाठी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. यासाठी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी तसेच लोकायुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी ओढ्यांमधील अतिक्रमणाबाबत महापालिका अधिकार्यांसमवेत चार ते पाच बैठका घेतल्या. प्रत्येक वेळी महापालिका प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. परंतु मनपा अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. विशेष म्हणजे उपलोकायुक्त यांच्यासमोर या विषयावर सुनावणी होऊन मनपा प्रशासनाला अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले, तरीदेखील या आदेशाचे मनपाने दखल घेतली नाही. यावेळी बोलतांना सचिन डफळ म्हणाले, महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ९५ किलोमीटर लांबीच्या ४१ ओढे व नाल्यावर ८.२३ किमी पर्यंत अतिक्रमण झालेले आहे. यात ४.९१ किमी लांबीचे नाले सद्यस्थितीत मोकळ्या जागेत असून ते पाईप टाकून बुजवले आहेत.
ज्या ठिकाणी नाले मोकळे आहेत तेथे घराच्या भिंती थेट नाल्याच्या हद्दीत बांधल्याने प्रवाह अरुंद झाले आहेत. अनेक ठिकाणी थेट नाल्यात घराच्या भिंती, पत्र्यांच्या शेड बांधले आहेत. यासाठी नागरिक कृती मंचाचे शशिकांत चंगेडे गेल्या तीन वर्षापासून नगर शहरातील ओढे नाल्यातील अतिक्रमण हटविण्यासाठी सातत्याने लढा देत आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी वारंवार आवाज उठवून देखील मनपा याकडे डोळे झाक करताना दिसत आहे. चार-दोन धनदांडग्या लोकांसाठी महानगरपालिका प्रशासन सामान्य नागरिकांचे प्राण धोयात आणत आहेत. तरी या प्रश्नात मनपाने त्वरित दखल न घेतल्यास आपल्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा सचिन डफळ यांनी दिला आहे.