नगरमधील एकाच इमारतीतील ६ फ्लॅटमधून भरदिवसा चोरी;लाखोंचा ऐवज लंपास मात्र फिर्याद घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

0
74

नगर – नगर शहरात जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एका इमारतीतील ६ फ्लॅट चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) दुपारी फोडून रोख रक्कम व दागिने असा लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. मात्र या भरदिवसा झालेल्या घरफोड्यांची फिर्याद घेण्यास कोतवाली पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आपली फिर्याद नोंदवून घ्यावी म्हणून चोरी झालेले नागरिक बुधवारी सायंकाळपासून पोलिस ठाण्यात चकरा मारत आहेत. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ चांदणी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पूजा कॉम्प्लेस ही इमारत आहे. या इमारतीत असलेले ६ फ्लॅट चोरट्यांनी बुधवारी (दि.१०) दुपारी ३.१५ ते ३.३० च्या सुमारास फोडले आहेत. यामध्ये माधुरी शिंदे यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड आणि ७ लाखांचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने चोरून नेले आहेत. या दागिन्यांसोबत त्यांचे बॉस आणि पावत्याही चोरट्यांनी चोरून नेल्या. रिजवान तांबोळी यांच्या फ्लॅटमधून १७ हजारांची रोकड चोरीला गेली आहे. या शिवाय डॉ. फ्रान्सिस, खान, प्रा. कोहली यांचेही फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. या सर्व फ्लॅटमध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणावर उचकापाचक करत फ्लॅटमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केलेले आहे.

पोलिस म्हणतात एवढे दागिने तुमच्याकडे होते का?

या घरफोड्या झाल्याचे लक्षात आल्यावर ज्यांचे फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत ते नागरिक बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांना आमच्याकडे माळीवाडा येथील गोळीबाराची केस असून त्याचा तपास सुरु आहे. तुम्ही उद्या सकाळी या असे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिक गुरुवारी (दि.११) सकाळी फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती केली. ७ लाखांचे सोने चोरीला गेलेल्या माधुरी शिंदे यांना तुमच्याकडे खरेच एवढे दागिने होते का? त्या दागिन्यांच्या पावत्या घेवून या असे सांगितले. शिंदे यांनी दागिन्यांच्या पावत्या बॉसमध्येच होत्या. चोरटे बॉससह दागिने घेवून गेले आहेत असे सांगत होत्या. परंतु त्यांचे म्हणणे पोलिसांनी ऐकून घेतले नाही. इतरांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.

चेन स्नॅचिंगचा गुन्हाही नोंदवला नाही

याच इमारतीत राहणार्‍या सरोज अरविंद हिवाळे या बुधवारी (दि.१०) सकाळी ६.१५ च्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. सैनिक लॉनच्या गेट समोरून त्या जात असताना त्यांच्या पाठीमागून एका मोटारसायकलवर दोघे जण आले. त्यांनी हिवाळे यांच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळा वजनाची सोन्याची चेन हिसका मारून तोडली व त्यांना ढकलून देत भरधाव वेगात तेथून पसार झाले. हिवाळे या रस्त्यावर पडल्या. त्यांना उठेपर्यंत ते दोघे चोरटे तेथून पसार झाले होते. त्यामुळे हिवाळे यांना त्यांच्या मोटारसायकलचा नंबरही पाहता आला नाही. याबाबत फिर्याद देण्यासाठी हिवाळे या कोतवाली पोलिस ठाण्यात गेल्या असता त्यांना आता साहेब नाहीत तुम्ही दुपारी १.३० वाजता या असे तेथील ठाणे अंमलदाराने सांगितले. त्यानंतर त्या दुपारी गेल्या असता त्यांची हकीकत लिहून घेतली. मात्र गुन्हा गुरुवारी (दि.११) दुपारी उशिरापर्यंत दाखल केला नव्हता. ही सर्व कैफियत ज्यांची चोरी झाली त्या महिलांनी व नागरिकांनी दैनिक नवा मराठाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली. तसेच पोलिस आमचे ऐकून घेत नाहीत मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा असा उद्विग्न सवाल केला.