महापालिकेतील समावेशानंतर भिंगारच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात

0
70

नगर – अहमदनगर कॅन्टोन्मेेंट बोर्ड महापालिकेमध्ये वर्ग होत आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर भिंगारमधील सदरबाजार येथील नागरिकांना मालमत्तेबाबत भविष्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे बोर्डचे मानद सदस्य वसंत राठोड यांनी पाठपुरावा सुरु केला आहे. कॅन्टोन्मेेंट बोर्ड क्षेत्राचे महापालिकेत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया प्रशासनस्तरावर जोरात सुरु झाली आहे. २५ जून २०२४ रोजी दिल्लीमध्ये संरक्षण सचिवांच्या झालेल्या बैठकांमध्ये संपूर्ण कॅन्टोन्मेेंट बोर्डची नागरी वसाहत महापालिकाकडे देण्याचे ठरले. परंतु अहमदनगर भिंगार कॅन्टोमेेंट बोर्ड येथील सदरबाजार भागातील मालमत्तेवरील मालकी हक्क केंद्र सरकारकडे राहणार आहेत. यामुळे सदरबाजार भागात राहणार्‍या नागरिकांना त्रास वाढणार आहे. जागेवर मालकी हक्क नसल्याने जागा विकणे, खरेदी करणे किंवा सातबारा उतारा काढणे, जागेवर कर्ज घेणे अशा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सदन कमांड पुणे या ठिकाणी संपर्क करावा लागेल. जो अत्यंत त्रासदायक आहे.

वसंत राठोड यांची केंद्र सरकारकडे मागणी

अशा प्रकारे सदरबाजार भागात राहणार्‍या नागरिकांना राज्य व केंद्र अशा दोन प्रशासनाला तोेंड द्यावे लागेल. याचे उदाहरण म्हणजे रामवाडी, कोठला बसस्थानक, तारकपूर भागातील नागरिक दुहेरी त्रास सहन करीत कसरत करीत आहेत. १९५६ सालामध्ये सर्व भाग वेगळा केला असला तरी, आजही तेथील रहिवाशांना सातबारा उतार्‍यासाठी पुणे येथेच चकरा माराव्या लागतात. ज्या मोकळ्या जागा महापालिकेकडे वर्ग होणार आहेत. त्या जागांवर केंद्र सरकारची मालकी असल्यामुळे त्यांना विकसित करण्यासाठी प्रत्येकवेळी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. या सर्व समस्या लक्षात घेता, सदरबाजार भागातील सर्व मालमत्तांचे मालकी हक्क हे राज्य सरकारकडे द्यावेत. म्हणजेच या सर्व मालमत्ता संबंधित घर मालकास मालकी हक्क देण्यात यावा, अशी मागणी श्री. राठोड यांनी सुजय विखेंच्या माध्यमातून केंद्राकडे केली आहे.