मोहरम मिरवणुकीत प्रशासनाने सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात

0
88

बारा इमाम कोठला मोहरम उत्सव समितीच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर – मोहरम उत्सवाहात प्रशासनाने सहकार्य करुन सर्वोतोपरि सोयी-सोयी उपलब्ध करुन द्यावे, अशा आशयाचे निवेदन बारा इमाम कोठला मोहरम उत्सव समितीच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. याप्रसंगी हाजी करीम हुंडेकरी, सय्यद खलील अब्दुल करीम, आय.बी.शाह, फारुक रंगरेज, सलीमतात्या रेडियमवाले, सय्यद साजिद आरिफ जहागिदार, सय्यद दस्तगीर बडेसाहेब जहागीरदार, अल्तमश जरिवाला आदिंसह समाज बांधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सालाबादप्रमाणे मोहरम उत्सव सर्व अहमदनगर शहरवासीयांसह देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. हा उत्सव साजरा करतांना इतर धर्मियांची पायमल्ली होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. इस्लाम धर्माचा अर्थच प्रेम बंधूभाव, शांतता आहे. हा उत्सवातून दाखविण्याची संधी आहे. नगर शहरातील मोहरम उत्सव हा सर्व जाती-धर्माचा उत्सव आहे. भारतात हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. शहरातील बारा इमाम कोठला येथे इमाम हुसेनची सवारी आहे (डोला). या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक उत्सव साजरा करत असतात. त्या अनुशंगाने सर्व प्रशासनाचे नेहमीच सहकार्य असते ते यंदाही राहील.

सालाबादप्रमाणे रात्री १२ वाजेपर्यंत पारंपारिक वाद्य वाजविण्याची परवानगी असते. सवारीवर भाविकांना फुले वाहण्यासाठी व सवारी बरोबर चालणार्‍या टेंबेवर तेल टाकण्याची सर्वधर्मियांची श्रद्धा आहे. भाविक रात्रभर सवारीबरोबर असतात, ही पाचशे वर्षांची परंपरा आहे. तसेच शहरातील विविध भागातील यंग पार्ट्यांना चादर मिरवणुकीला कायद्याच्या चौकटीत विनाअट परवानगी देणे, कत्तलच्या रात्री वाद्यांना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देणे याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना आदेश द्यावेत. सवारी मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवून पॅचिंग करण्यात यावे. मिरवणुक मार्गावर वीज वितरण कंपनीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात यावेत, मिरवणुकीबरोबर सर्व सोयीयुक्त अ‍ॅम्ब्युलन्स असावी, तसेच दोन मोबाईल शौचालयाची व्यवस्था व्हावी, बारा इमाम कोठला येथे सालाबादप्रमाणे जनरेटर, हॅलोजन लाईटची व्यवस्था करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.