नगरमध्ये १६ जुलै रोजी ‘महा रक्तदान’ शिबीर

0
49

अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे आयोजन

नगर – माणुसकीचे नाते जोडणारे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे असे म्हणतात. अत्यवस्थ रूग्ण, थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना एखाद्याने केलेले रक्तदानच जीवदान देणारे ठरते. रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रूजण्यासाठी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नगर जिल्ह्याच्या इतिहासातील विक्रमी रक्त पिशव्या संकलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. १६ जुलै रोजी सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत न्यू टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स येथे सदर शिबीर होणार आहे, अशी माहिती ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष अजित जगताप व अहमदनगर जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी दिली. या शिबीरासाठी संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशन, आय लव्ह नगर, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. नगरमधील दहा रक्तपेढींची टिम शिबिरात रक्त संकलनाचे काम पाहणार आहे. या उपक्रमाचे स्वागत करताना आ.संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत २०२२ मध्ये महा रक्तदान शिबिर घेवून विक्रमी रक्त संकलन केले होते. यावर्षी देखील असाच विक्रमी रक्तदानाचा संकल्प करण्यात आला आहे. रक्तदान चळवळ ही काळाची गरज आहे.

एखाद्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान गरजू रूग्णांसाठी वरदान ठरते. अनेक आजारात रक्त घटकांचीही आवश्यकता असते. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी कृत्रिम रक्त निर्मिती शय झालेली नाही. अशावेळी माणसाने माणसासाठी केलेले रक्तदानच महत्वाचे असते. रक्तदानामुळे रक्तदात्याचे आरोग्यही चांगले राहते हे संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे नगरचे हे महा रक्तदान शिबीर महाराष्ट्राच्या नकाशावर येईल यासाठी जास्तीत जास्त नगरकरांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आ. जगताप यांनी केले आहे. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, रक्तदान हा अतिशय महत्वाचा विषय आहे. जसे आपण म्हणतो अन्नदान हे श्रेष्ठ दान तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. नगरकर सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. रक्तदान चळवळ नगरकरांनी पुढे नेलेली आहे. त्यामुळे आताच्या महा रक्तदान शिबीरातही नगरकरांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून रक्तदानाचे पवित्र कार्य करावे, असे आवाहन फिरोदिया यांनी केले आहे. नगरकरांनी प्रतिसाद द्यावा व सहभाग नोंदवावा असे आवाहन असोसिएशनच्या वतीने कोअर कमिटी सदस्य अमित बुरा, रितेश सोनीमंडलेचा, साजीद खान, प्रितम तोडकर, राकेश सोनीमंडलेचा, हिरा खुबचंदानी, मनोज बरलोटा, संतोष बलदोटा, गोरख पडोळे, मनिष चोपडा, अतुल रच्चा आदींनी केले आहे.