वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांना मनपा आयुक्तपदी बसवण्यासाठी लोकप्रतिनिधीची राजकीय ताकद पणाला

0
51

मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव, डांगेंची नियुक्ती तात्काळ रद्द करा

नगर – मनपाला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. फरार आयुक्त पंकज जावळे आणि त्यांचा पीए देशपांडे हे अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. ज्या राजकीय नेतृत्वाने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती त्यांचा या भ्रष्टाचार्‍यांना वाचविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. या जागी मनपा प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या देविदास पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती. मात्र भ्रष्टाचार्‍यांना वाचवू पाहणार्‍या नेतृत्वाला पवार यांच्या ऐवजी नगर मनपामध्ये यापूर्वी उपायुक्त म्हणून अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांना आयुक्तपदी बसवण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावण्याची दुर्बुद्धी झाली. मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव आहे. हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यशाली आहे. राज्य सरकारने डांगे यांच्या नियुक्तीचा फेरविचार करत तात्काळ रद्द करावी अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वीच्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी शहराच्या स्थानिक आमदारांनी शिफारस केली होती. भ्रष्टाचारी असणार्‍या अत्यंत अयोग्य व्यक्तीची शिफारस करण्यात आली. त्यामुळे संगनमतातून सर्वसामान्य नगरकरांना लुटले गेले. वेठीस धरले गेले.

धाडस करत संबंधित तक्रारदाराने त्यांच्या विरोधात अँटी करप्शनच्या माध्यमातून ट्रॅप लावला. जर ते दोषी नव्हते तर अद्याप फरार का आहेत? त्यांना वाचविण्यासाठी राजकीय नेतृत्वाकडून जीवाचा अकांड तांडव का केला जात आहे? हे नगरकरांना माहित आहे. पुढे म्हटले आहे की, या भ्रष्टाचाराबद्दल सर्वसामान्य नगरकरांमध्ये सर्वच स्तरात तीव्र संतापाची भावना आहे. असे असताना प्रशासकीय कामकाजाचा तब्बल २० ते २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या देविदास पवार यांची नियुक्ती अवघ्या दोनच दिवसात तातडीने रद्द करून अति जलद गतीने सर्व प्रशासकीय प्रक्रियांच्या पूर्ततेचा फार्स करून यापूर्वी मनपात उपायुक्त पदावर काम केलेल्या यशवंत डांगे यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकार्‍याची नियुक्ती राज्य सरकारने करणे हे अत्यंत धक्कादायक आहे. यासाठी ज्या राजकीय नेतृत्वाने यापूर्वीच्या आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कौतुकाचे इमले चढवत लेखी शिफारस केली होती त्यांनीच आता डांगे यांच्या नियुक्तीसाठी देखील आपले राजकीय वजन पणाला लावले होते. या नियुक्तीचा म ास्टरमाईंड कोण आहे हे नगरकरांना माहित आहे. यापूर्वीच्या आयुक्तांकडून भ्रष्टाचाराची अर्धवट राहिलेली कामे नवीन आयुक्तांच्या माध्यमातून करून घ्यायची आहेत की काय? म्हणूनच या नव्या नियुक्तीचा अट्टाहास केला आहे की काय? असा सवाल किरण काळे यांनी केला आहे.

डांगे यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी करा

यशवंत डांगे यांनी यापूर्वी नगर मनपामध्ये उपायुक्त पदावर काही काळ काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ज्या ज्या फाईलींवर सह्या केल्या आहेत, ज्या कामाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत त्या सर्व कामांची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समितीमार्फत करण्यात यावी. त्यातून डांगे यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे उघड होतील. त्यासाठी मंत्रालय स्तरावरून तातडीने चौकशी समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी, किरण काळे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

मनपात झिरो करप्शन हवे, नियुक्तीचा निषेध

यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या यशवंत डांगे यांच्या नियुक्तीचा आम्ही शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने तसेच नगरकरांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत. नगरकरांना मनपामध्ये झिरो करप्शन (शून्य भ्रष्टाचार) हव आहे. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी काँग्रेस तीव्र स्वरूपाचा लढा उभा करेल, असा इशारा काळे यांनी दिला आहे.

आपली पापे झाकण्यासाठी अशा नियुक्त्या

यापूर्वीच्या आयुक्तांकडून संगनमत करत केलेल्या भ्रष्टाचाराची आपली पापे उघड होऊ नयेत यासाठी आपल्या मर्जीतील अधिकार्‍याला सत्तेतील स्थानिक राजकीय नेतृत्वाकडून आणले गेले आहे. जेणेकरून यापूर्वी केलेली भ्रष्टाचाराची कृत्ये झाकता येतील. त्यासाठी काहीजण आटापिटा करीत आहेत. ज्यावेळी पापाचा घडा भरतो आणि ओसंडून वाहतो त्यावेळी मायबाप जनता जनार्दन भ्रष्टाचारी अधिकारी आणि राजकीय नेतृत्वाला त्यांची जागा दाखवून देते, हे अशा नियुक्तीसाठी पाठबळ देणार्‍यांनी लक्षात ठेवावे, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.