केडगावमधून भैरवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
नगर – आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जयघोषात व टाळमृदंगांच्या निनादात वारकरी श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. महाराष्ट्राला वारकर्यांची मोठी परंपरा आहे. संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज पालख्यांबत राज्याच्या विविध कानाकोपर्यांतून संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. ऊन, पावसाची पर्वा न करता वारकरी पायी पंढरपूरला जात असतात. पालखी मार्गावर अनेकजण वारकर्यांची सेवा करतात. वारकर्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे विठ्ठलाची आषाढी वारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर यांनी केले. केडगाव भैरवनाथ मंदिर येथून पायी दिंडीची कोतकर कुटुंबीयांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर दिंडीने केडगाव देवीमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, सचिन कोतकर, वैशाली कोतकर, दिंडी चालक क्षीरसागर महाराज, बाबासाहेब कोतकर, माजी सभापती मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, संजय मामा कोतकर, संदीप दादा कोतकर युवा मंचाचे अध्यक्ष भूषण गुंड, बबन मतकर, बाळू शिंदे, अनिल ढुबे, मच्छिंद्र हुलगे, गोविंद कोतकर, विजय कोतकर, अंज्याबापू सातपुते, बापू सातपुते आदींसह पंचक्रोशीतील वारकरी उपस्थित होते. यावेळी श्री. सचिन उद्योजक सचिन कोतकर म्हणाले की, मागील ३४ वर्षांपासून केडगावच्या भैरवनाथ देवस्थानच्या वतीने भानुदास कोतकर व माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा आयोजित केला जातो. याही वर्षी दिंडीत केडगावमधील वारकरी सहभागी झाले आहेत. मागील दोन वर्षांपासून केडगावचे भाग्यविधाते भानुदास कोतकर यांच्या विशेष प्रयत्नातून पंढरपूर येथे भैरवनाथ देवस्थान वारकरी भवन उभारण्यात आले आहे. येथून जाणार्या प्रत्येक वारकर्याची राहणे व भोजनाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे. केडगावमधील सर्व नागरिकांना निरोगी व उत्तम आरोग्य लाभावे. त्यांच्या हातून आई-वडिलांची आणि धर्म संस्कृतीची सेवा घडावी, अशी प्रार्थना यावेळी विठ्ठला चरणी उद्योजक सचिन कोतकर यांनी केली. माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर म्हणाल्या की, अनेक दिवसापासून पंढरीला पायी जाण्याची इच्छा होती, ती इच्छा आज भैरवनाथ दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. वारकर्यांसोबत राहण्याचा आनंद व अनुभव यामधून मिळणार आहे. केडगाव येथे जातीय सलोख्याचे अनोखे दर्शन पहावयास मिळाले. मुस्लिम बांधवांनी दिंडीचे पूजन करून एक आदर्श समाजासमोर ठेवला, असे त्या म्हणाल्या.