जगदीश भगवानच्या जयजयकारात नगरमध्ये रथयात्रा

0
51

नगर – श्री खाकीदास बाबा (माहेश्वरी) मठाच्या वतीने जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर श्री विष्णूचे अवतार भगवान श्री जगदीशांच्या रथयात्रेचे आयोजन रविवारी सायंकाळी करण्यात आले होते. सजवलेल्या रथात भगवान जगदीश्वराची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. रथयात्रेचे यजमान शरद झंवर यांच्या हस्ते उत्सव मूर्तीचे विधिवत पूजन करून जगदीश भगवानच्या जयजयकारात रथयात्रेस प्रारंभ झाला. या रथयात्रेत माहेश्वरी समाजातील भाविक उत्साहात पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. लालटाकी येथील खाकिदास बाबा मठापासून वाजत गाजत निघालेली ही रथयात्रा अप्पू चौका पर्यंत जावून पुन्हा मंदिरात आली. यावेळी सहभागी झालेल्या भाविकांनी श्रीरामाची, श्रीकृष्णाची पारंपरिक गाणे म्हणत नृत्य करत उत्साहात सहभाग घेतला. महिला भाविकांनीही फेर धरून आनंद व्यक्त केला. खाकीदास बाबा मठाचे अध्यक्ष दीपक काबरा म्हणाले, दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने ही रथयात्रा ट्रस्टच्या वतीने होत आहे. माहेश्वरी समाजाबरोबरच इतर समाजातीलही भाविकही यामध्ये उत्सहात सहभागी होतात. खाकीदास बाबा मठाचे सर्व पदाधिकारी व ट्रस्टी यासाठी सहकार्य असते. यावेळी यजमानांच्या हस्ते भगवान श्री जगदिशाची महाआरती करून व भाविकांना प्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता झाली