बॅटलडोर अ‍ॅकॅडमीकडून उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू घडविण्याचे कार्य

0
28

आ. संग्राम जगताप यांचे प्रतिपादन; सहा दिवस चालणार सांघिक व वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धा; पहिल्या फेरीत अहमदनगर मुलींचा संघ विजयी

नगर – बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमी माध्यमातून बॅडमिंटनचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे कार्य केले जात आहे. खेळाडूंना प्रशिक्षण वर्ग व स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे काम सुरु आहे. स्पर्धेतून शिकायला मिळते व स्वत:चे आत्मपरीक्षण होते. ही स्पर्धा पुढील स्पर्धेसाठी प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. १७ वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि १५ वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंयपद बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या मान्यतेने व नगर बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोपाला पाणी अर्पण करुन करण्यात आले. यावेळी क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य मिलिंद कुलकर्णी, डॉ. भुषण अनभुले, राहुल मोटे, माजी नगरसेवक संजय चोपडा, मुख्य पंच मिलिंद देशमुख, उप मुख्य पंच विश्वास देसवंडीकर, स्पर्धा नियंत्रक सचिन भारती, डॉ. मंजिरी कुलकर्णी, मृन्मयी कुलकर्णी, मधुरा कुलकर्णी, मल्हार कुलकर्णी, स्पर्धा समिती सदस्य कान्हेरे, अजय भोयर, योनेस सनराइजचे रहेमत खान आदी उपस्थित होते. पुढे आमदार जगताप म्हणाले की, बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने शहर, जिल्हा व राज्य पातळीवर स्पर्धेचे उत्तम प्रकारे नियोजन केले जाते. या स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपर्‍यातून संघ दाखल झाले आहेत. या स्पर्धेतून खेळाडू महाराष्ट्राच्या नकाशावर चमकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात मुख्य पंच मिलिंद देशमुख म्हणाले की, मागील दोन वर्षापासून सलग आंतरजिल्हा स्पर्धेचे आयोजन शहरात होत आहे. उत्तम प्रकारे नियोजन करून ही स्पर्धा पार पाडत आहे. प्राविण्य पणाला लावून जिल्ह्यातील संघ स्पर्धेत उतरले आहे. बॅडमिंटन खेळाचा प्रसार-प्रसार होण्यासाठी उत्तम प्रकारे स्पर्धा पार पडत आहे. ग्रामीण भागातील मुले बॅटल डोअरमध्ये प्रशिक्षणासाठी सहभागी होत असून, चांगले खेळाडू पुढे येताना दिसत असल्याचे स्पष्ट करुन, या स्पर्धेमुळे खेळाडूंना दहावीच्या गुणात देखील वाढ होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आ. जगताप यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलमधील कोर्टवर मैदानाचे पूजन करुन व नारळ फोडून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आमदारांनी देखील रॅकेट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी केली. स्वागत मिलिंद कुलकर्णी व मल्हार कुलकर्णी यांनी केले.