नगरमधील सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्द

0
67

जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्ताव मंजूर;

 

नाशिक कारागृहात केली रवानगी नगर – तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत दहशत करणार्‍या सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करून त्याला नाशिक येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. अक्षय नवनाथ खटावकर (वय २६, रा. भिस्तबाग महालाजवळ, सावेडी) असे कारवाई झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी मंजूरी देत याबाबत आदेश काढले आहेत. खटावकर हा नगर शहर व परिसरात खूनाचा प्रयत्न, विनयभंग, धारदार शस्त्रांनी शिवीगाळ करून मारहाण करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सर्व सामान्य लोकांवर दहशत निर्माण करत होता. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्था धोयात आली होती. खटावकर विरोधात तोफखाना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या, परंतू त्या अपुर्‍या व कुचकामी ठरत होत्या. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाची अधीक्षक ओला यांनी बारकाईने पडताळणी करून शिफारस अहवाल जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे सादर केला होता. खटावकर विरोधात तीन दखलपात्र व सहा अदखलपात्र गुन्हे दाखल आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पडताळणी करून सामाजितक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता सराईत गुन्हेगार खटावकर विरोधात ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई करून त्याला नाशिक कारागृहात स्थानबध्द केले आहे.