कारवाईसाठी थांबलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

0
97

पथकाने पाठलाग करून पिकअप पकडला; ३२ गोवंशीय जनावरांची केली सुटका

नगर – कत्तलीसाठी नेल्या जाणार्‍या गोवंशीय जनावरांची गाडी अडवून कारवाईसाठी थांबलेल्या कोतवाली पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव येथे घडली. यात एकाच्या हातावर मारहाण करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी केडगावपासून पीकअपचा पाठलाग करत झेंडीगेट येथे वाहन अडवले. चौघांना ताब्यात घेत वाहनातील ३२ गोवंशीय वासरांची सुटका करण्यात आली. सुप्याकडून नगरच्या दिशेने बोलेरो पिकअपमधून (क्र. एम एच १४ ई एम २८४९) गोवंशीय वासरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनवाडी चौक, केडगाव येथे हा पिकअप अडवण्याचा प्रयत्न केला. चालकाने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या निरंजन कारले याच्या हातावर पिकअपमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केले. पथकाने वाहनचा पाठलाग करुन झेंडीगेट येथे पिकअप फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतला. त्यातून ३२ वासरांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आलया कृष्णा काळे (वय ५०), संदीप आलया काळे (वय २४), आलेश काळे (वय २२), अशोक आलया काळे (वय २६, सर्व रा. औसरी खुर्द, ता. आंबेगाव) या चौघांना ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र चंद्रभान पालवे यांच्या फिर्यादीवरून या चौघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच महाराष्ट्र प्राणी रक्षाचे अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब), ९ सह प्राणी लेश प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार दिपक रोहोकले, राजेंद्र पालवे, तानाजी पवार, सत्यम शिंदे, सुरज कदम व पोहेकॉ खराडे, पोकॉ/ गावडे यांच्या पथकाने केली. जनावरे घेवून जाणारा आणखी एक टेम्पो पकडला दरम्यान या कारवाईपूर्वी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या पथकाने केडगाव येथील सोनेवाडी रोड चौकात अशोक लेलंड कंपनीची मिनी टेम्पो (क्र.एम एच १६ सी सी ८५१५)पकडून त्यातून कत्तली साठी चालवलेल्या गायी व वासरांची सुटका केली. तसेच टेम्पो चालक मन्नान इब्राहीम शेख (वय ५०, रा. हमाल वाडा, झेंडीगेट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पो.कॉ. सुरज कदम यांनी फिर्याद दिली आहे.