पांगरमलच्या सरपंचासह ७ जणांना तरुणाच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक

0
37

नगरच्या न्यायालयाने सुनावली १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

नगर – शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत चांगदेव नामदेव चव्हाण (वय २५ रा. पखोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील पांगरमल शिवारात गुरूवारी मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पांगरमलचा सरपंच अमोल आव्हाडसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी (दि.५) न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरपंच अमोल भरत आव्हाड, महादेव किसन आव्हाड, उध्दव महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड, आकाश अशोक वाकडे, अक्षय अंबादास आव्हाड (सर्व रा. पांगरमल) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. नगर तालुयातील एका गावात राहणार्‍या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खून, मॉब लिंचिंग, विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला नगर तालुयातील एका गावातील रहिवाशी असून तिच्या मुलासह चांगदेव चव्हाण व प्रवीण भोसले (पूर्ण नाव, पत्ता नाही) गुरूवारी मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान पांगरमल गावात असताना गावचा सरपंच अमोल आव्हाड व इतरांनी शेळ्या चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीत चांगदेव चव्हाण यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुरूवातील चौघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीतून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकुण सात जणांना गुन्ह्यात अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.