व्यावसायिक व राजकिय उद्देशाने नाव खराब करण्यासाठी गुन्ह्यात गोवले

0
27

सखोल तपास करण्याची सचिन कोतकर यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

नगर – व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या दोन कर्मचार्‍यांमधील वैयक्तिक वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात नाव गोवण्यात आले असल्याचा खुलासा उद्योजक तथा हॉटेल व्यावसयिक सचिन कोतकर यांनी केला आहे. तर घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी असताना याप्रकरणात गोवले गेल्याचे स्पष्ट करुन या प्रकरणाचा सखोल तपास करुन उच्चस्तरीय अधिकारी नेमण्याची मागणी श्री. कोतकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. उदयनराजे पॅलेस व यश पॅलेस हे हॉटेल एकमेकांच्या समोरासमोर आहे. २ जुलै रोजी यश पॅलेसचा मॅनेजर राकेश कुमार सिंग व उदयनराजे पॅलेस मध्ये काम करणारा प्रिन्सकुमार सिंग यांनी वैयक्तिक वादातून एकमेकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे संबंध नसताना माझे नाव गोवले असल्याचे श्री. कोतकर यांनी म्हंटले आहे. या घटनेच्या दरम्यान तीन ते चार दिवसापासून कुटुंबियांसमवेत बाहेरगावी असताना व या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नसताना राजकीय लोकांनी या घटनेचे भांडवल करुन नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवण्याचे काम केले आहे. फक्त व्यावसायिक स्पर्धेतून व त्रास देण्याच्या हेतूने हा प्रकार घडला आहे. राकेश कुमार सिंग हा उदयनराजे पॅलेस येथे चार वर्षांपूर्वी कामास होता. त्याला चार वर्षांपूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. २०२१ पासून आज पर्यंत त्या व्यक्तीशी कोणतेही बोलणे अथवा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाही. त्या व्यक्तीस शिवीगाळ करण्याचा प्रश्न उद्भवत नाही व कोणत्याही प्रकारे कोणाला शिवीगाळ करण्यात आलेली नाही. तर याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.