माजी आमदाराला खंडणी मागणार्‍या पत्रकाराविरुद्ध आणखी १ खंडणीचा गुन्ह

0
79

भिंगारमधील कापड व्यावसायिकाला ३ लाख ७५ हजार रुपयांची मागितली खंडणी

नगर – अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी देऊन आष्टीचे (जि. बीड) माजी आमदार भीमराव धोंडे यांना १ कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी अटक केलेल्या न्यूज पोर्टलच्या पत्रकाराविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा शनिवारी (दि.२९) रात्री उशिरा दाखल झाला आहे. या प्रकरणी व्यावसायिक अकिब ऊर्फ अतिक मोहमंद शेख (वय २२ रा. मोमीन गल्ली, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. इस्माईल दुराणी उर्फ भैया बॉसर (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. त्याने शेख यांच्याकडे ३ लाख ७५ हजार रूपयांची मागणी करून ३० हजार रूपये घेतले आहे. शेख यांचे कपड्याचे दुकान असून त्यांची पत्रकार असलेल्या भैया बॉसर सोबत २४ मे २०२४ रोजी ओळख झाली होती. त्यानंतर बॉसरने शेख यांना नगर – पाथर्डी रस्त्यावरील स्टेट बँक चौकातील छावणी परिषदच्या गाळ्यासमोर बोलून ‘तु काय धंदे करतो ते मला माहिती आहे, मी पत्रकार असून तु मला ३ लाख ७५ हजार रूपये दे नाहीतर मी तुझी चॅनलला बातमी लावून बदनामी करेन’ अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून शेख यांनी त्याला १८ जून २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्टेट बँक चौकातील रिजू याच्या चहाच्या टपरीवर ३० हजार रूपये दिले होते. दरम्यान त्यानंतरही त्याने २६ जून २०२४ रोजी शेख यांच्याकडे उर्वरित ३ लाख ४५ हजार रूपयांची मागणी केली. ‘तु जर पैसे नाही दिले तर तुझी बातमी चॅनलला टाकीन’ अशी धमकी दिली व ‘टाइम्स ऑफ अहमदनगर’ या वेबपोर्टलवर गुटखा विक्री बाबतची बातमी प्रसारित केली. दरम्यान ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शेख हे बॉसरला भेटून ‘तु माझी विनाकारण बदनामी करू नको, मी कोणताही अवैध धंदा करत नाही’, असे समजावून सांगितले असता त्याने शेख यांच्याकडे पुन्हा ३ लाख ४५ हजार रूपये खंडणीची मागणी केली. ‘तु जर मला पैसे दिले नाहीतर तुला जिवंत मारून टाकीन’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत