माता-भगिनींसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय, कर्मचार्यांची संख्या तातडीने वाढविण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी
नगर – महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभासाठी पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी तलाठी कार्यालये आणि सेतू कार्यालयांमध्ये महिलांची मोठी झुंबड उडाली आहे. योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव व लाभार्थी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात असून, त्यासाठी मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा शासकीय यंत्रणेवरही मोठा ताण आला असून, अपुर्या कर्मचारी संख्येमुळे तलाठी व सेतू कार्यालयांच्या दारात ‘रांगा’ लागल्या आहेत. राज्य सरकारने माझी लाडकी बहिण योजना घोषित केली. त्यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारले जाणार आहेत. या अर्जासोबत जन्मदाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला यासह आवश्यक कागदपत्र जोडणे बंधनकारक आहे. सदरची कागदपत्रे मिळविण्यासाठी योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी १ जुलै रोजी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालये, सेतू कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी झाली आहे. शहरातील नालेगाव तलाठी कार्यालयात सोमवारी (दि. १) सकाळी महिलांचीझुंबड उडाली होती. कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने महिला-नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे रहावे लागले. या योजनेबरोबरच सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियाही सुरू आहेत. त्यामुळे कागदपत्रांसाठी विद्यार्थी आणि पालकांचीही तलाठी, सेतू आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. त्यामुळे या कार्यालयांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. सदर योजनेत २१ ते ६०
वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत.
अर्ज भरण्यासाठी केवळ १५ दिवसांचीच मुदत असल्याने शासकीय यंत्रणेवर गर्दीचा ताण वाढला आहे. तलाठी कार्यालयात कर्मचारी संख्या वाढवा लाडकी बहिण योजना आणि विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही एकाच वेळी आली आहे. त्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांची विविध दाखले आणि कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयात गर्दी वाढली आहे. शहरातील माळीवाडा आणि नालेगाव या दोन्ही तलाठी कार्यालयात महिलांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी पालकही प्रवेश प्रक्रियेसाठी दाखले मिळविण्यासाठी कार्यालयात येत आहेत. परंतु कर्मचारी संख्या अपुरी असल्याने माता-भगिनींसह विद्यार्थी-पालकांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार व प्रशासनाने तलाठी कार्यालयात कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष रवि दंडी यांनी केली आहे.