आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ पंकज जावळे यांच्या घोटाळ्याच्या चौकशीची दिलीप सातपुते यांनी केली मागणी

0
43

नगर – अहमदनगर महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्याला जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व नगर शहराचे आ. संग्राम जगताप हे आहेत. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची एकत्रितपणे चौकशी करावी, अशी मागणी शिंदे गट शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या संदर्भामध्ये दिलीप सातपुते यांनी प्रसारमाध्यमांच्या समवेत भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी नगर महानगरपालिकेमध्ये मोठे घोटाळे झालेले आहेत. पंकज जावळे यांची कारकीर्दही या अगोदर सुद्धा गाजलेली आहे. सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. या व्यक्तीला नगरमध्ये आणण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतलेला होता, असा आरोप दिलीप सातपुते यांनी केला. त्यांच्या माध्यमातूनच त्यांनी महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे घालण्यास सुरुवात केली होती. आयुक्त यांना हाताशी धरून आ. संग्राम जगताप यांनी अनेक ठिकाणी जागा लाटली आहे. वफ बोर्डाला सुद्धा यांनी फसवले आहे. त्यामुळे नगर शहरांमध्ये आ. संग्राम जगताप यांनी जे काही घोटाळे केलेले आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी केली पाहिजे यासाठी सरकारकडे मागणी सुद्धा करणार असल्याचे सातपुते म्हणाले.