पुन्हा दोन मालट्रक समोरासमोर धडकल्या; आठवडाभरात तिसरा भीषण अपघात
नगर – नगर शहराच्या बाहेरील बायपास रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून निंबळक शिवारात पुलावर रात्रीच्या वेळी २ मालट्रकची समोरासमोर धडक होवून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२६) पहाटे ३ च्या सुमारास घडली. गेल्या आठवडाभरातील हा तिसरा अपघात आहे. हिरा राम (वय १९, रा. बाड्नेर, राजस्थान) असे या अपघातातील मयताचे नाव आहे. बायपास रस्त्यावर निंबळक शिवारात पुलावर २ मालट्रकची समोरासमोर धडक झाली. त्यातील एका ट्रकमध्ये लिनर असलेला हिरा राम हा जागीच ठार झाला. तर दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. ना. संदीप पितळे हे करत आहेत. बायपास रस्त्यावर गेल्या ६ दिवसांतील हा तिसरा अपघात आहे.
मागील शनिवारी (दि.२२) सकाळी ७.३० च्या सुमारास अरणगाव ते वाळूंज बायपास रस्त्यावर मालट्रक व कंटेनरची समोरासमोर धडक होवून दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सोमवारी (दि.२४) पहाटे २.३० च्या सुमारास नेप्ती कांदा मार्केट च्या पुढे नेप्ती शिवारात रस्त्यावरच उभ्या करण्यात आलेल्या कंटेनरवर भरधाव वेगातील आयशर टेम्पो धडकून टेम्पो चालक जागीच ठार झाला होता. तर बुधवारी (दि.२६) पहाटे निंबळक शिवारात पुलावर २ मालट्रकची समोरासमोर धडक झाली. या ३ अपघातात चौघांचा बळी गेला आहे.
आंदोलनानंतरही सुरक्षेच्या उपाययोजना नाहीतच
बायपास रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून या रस्त्यावर कुठे चारपदरी तर कुठे २ पदरी वाहतूक सुरु आहे. याबाबत कुठलेही माहिती फलक अथवा वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने केलेल्या नसल्याने या बायपास रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. १५ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे २ वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने दिलेल्या आश्वासना प्रमाणे उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सातत्याने असे अपघात होत आहेत.