वृक्षांमुळे मानवी जीवन प्रभावित : सीईओ विक्रांत मोरे

0
123

’स्नेहबंध’तर्फे छावणी परिषद कार्यालय परिसरात वृक्षारोपण

नगर – वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणजे झाड आपले मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. वृक्ष केवळ आपलेच जीवन प्रभावित करतात असे नव्हे, ते तर आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात, असे प्रतिपादन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने छावणी परिषद कार्यालय परिसरात मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, वरिष्ठ राजस्व लिपिक शिशिर पाटसकर, भूमी लिपिक अमोल कुलट, लिपिक रोहित पाटील, शिल्पकार बालाजी वल्लाल, निशांत पानसरे आदी उपस्थित होते. स्नेहबंध फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी विविध शासकीय कार्यालये, शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून छावणी परिसर कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावला.

वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचे आवाहन

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्षांचा होत असलेला मृत्यू हा पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा हळूवारपणे होत असलेला अंत आहे. हे ध्यानात घेऊन मानवाने वृक्षाची लागवड व संवर्धन करावे, असे आवाहन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.