हॉटेल व्यावसायिकाच्या घरातून भरदिवसा चोरी; दागिन्यांसह ४ लाखांचा ऐवज लंपास

0
42

नगर – हॉटेल व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी १.४५ या कालावधीत नगर तालुयातील चास शिवारात घडली. नगर – पुणे महामार्गावर चास शिवारात असलेल्या फलके फार्म या हॉटेलच्या मालकांच्या घरी ही घरफोडी झाली आहे. याबाबत अंबादास विश्वनाथ फलके (वय ५७, रा. चास शिवार, ता.नगर) यांनी याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फलके यांचे चास शिवारात महामार्गालगत हॉटेल असून त्याच्या समोरील बाजूस चास ते भोरवाडी जाणार्‍या रस्त्यावर घर आहे. बुधवारी (दि.२६) सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत घरातील सर्वजण हॉटेलवर कामात मग्न असताना आणि पावसाची रिपरिप सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घरात उचकापाचक करत घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दुपारी २ च्या सुमारास चोरीची ही घटना निदर्शनास आल्यावर फलके यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी फलके यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भा.दं.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग करीत आहेत.