महापालिकेच्या आयुक्त व पीए ने मागितली ८ लाखांची लाच

0
39

नगर – अहमदनगर महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने गुरुवारी (दि.२७) कारवाई केली असून दुपारी उशिरापर्यंत या अधिकार्‍याचे नाव समजू शकले नाही. या पथकाने महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांचे कार्यालय दुपारी सील केल्याची शहरात उलट सुलट चर्चा होत होती. ’महापालिकेतील बडा अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात’ असा मजकूर असलेल्या पोस्ट सकाळपासूनच सोशल मिडीयावर शहरात सर्वत्र फिरत होत्या. कारवाई करणारे पथक हे जालना येथील असल्याचीही चर्चा रंगली होती. महापालिकेतील तो बडा अधिकारी कोण? अशीही चर्चा होत होती.

मात्र अधिकृत माहिती समोर येत नव्हती, त्यामुळे कारवाईच्या अफवा आहेत की काय अशी शंका अनेकजण उपस्थित करत होते. दुपारी कारवाई करणारे पथक शासकीय विश्रामगृहावरून महापालिकेत आले. तेथे आयुक्त डॉ.जावळे यांच्या कार्यालयात काही वेळ थांबले. त्यानंतर या पथकाने दुपारी २ च्या सुमारास आयुक्तांचे कार्यालय सील केले आहे. नगर रचना विभागातील एकाला चौकशीसाठी या पथकाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत होते. मात्र दुपारी उशिरापर्यंत या पथकाने कारवाईबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली नव्हती. त्यामुळे कारवाई नेमकी कोणावर झाली, कशामुळे झाली याची माहिती मिळू शकली नाही.