नगर – महाराष्ट्र पोलीस दलाचा २ जानेवारी १९६१ हा स्थापना दिवस. या दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. या पोलीस दलाचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाय. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलाने आपला ६२ वा वर्धापन दिन साजरा केला परंतु पोलीस ब्रीदवायात विसंगती असल्याचे मला अनेक वर्षांपूर्वी निदर्शनास आले. महाराष्ट्र पोलीस दलाकडून सदरक्षणाय खलनिग्रहणाय व सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे दोन शब्द वापरले जाते हे लक्षात आल्यानंतर मी ही बाब मोठ्या हिंमतीने अहमदनगर पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून द्यायचे ठरवले असे तक्रारदार शेख शहाजान यांनी स्पष्ट करत १९ जानेवारी २०१६ रोजी सौरभ त्रिपाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक असताना निवेदन देऊन चर्चा केली असता तुम्ही हे प्रसिध्दी साठी करता असे अधिक्षकांचे म्हणने होते. चर्चे दरम्यान सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचे ब्रीद असल्याची मला खात्री झाली. त्यानंतर मी महाराष्ट्र शासन व पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे पाठपुरावा करत राहिलो व अंशतः यश आले ते ३.१.२०२० च्या पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथून निर्गमित झालेल्या पत्राने.
या पत्रात सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचे ब्रीद असल्याचेही मान्य करण्यात आले परंतु आजही अंमलबजावणी झालीच नाही. आजही पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर तसेच पुर्ण महाराष्ट्रात सोयीनुसार दोन्ही ब्रीदचा वापर केला जातोय. पोलीस ध्वज, पोलीस लोगो, पोलीस वाहने, कार्यालयातील कागदपत्रे… अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या चुकीच्या ब्रीद चा वापर होतोय याचाच अर्थ अधिक्षक कार्यालयातील पत्र दुर्लक्षित झाले. मग मी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल केली असता यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे असे उत्तर मिळाले. मी परत २०२२ मध्ये आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली असता जून २०२४ मध्ये सदर तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे आली असता हि तक्रार मला पत्र देऊन निकाली काढण्यात आली या पत्रात खालील माहिती आहे – सदर बाबत अधीकार व निर्णय या दोन्ही बाबी शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचें अधीकार कक्षेत येत असल्याने याबाबत आपण शासन तसेच पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी. शिस्तप्रिय महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकार्यांनी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचे ब्रीद असल्याचे मान्य केले असतानाही फक्त महाराष्ट्र शासन व पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचे बाकी असल्याने ६२ वर्षांनंतरही पोलीस ब्रीद मधील विसंगती अनाकलनीय आहे ही खेदाची बाब आहे. तरी महाराष्ट्र शासन व पोलीस महासंचालकांनी ब्रीद मधील विसंगती दूर करून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे चुकीचे व सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे योग्य ब्रीद असल्याचे मान्य करून विसंगती दूर करावी अशी मागणी तक्रारदार शेख शहाजान फकीर यांनी केली आहे.