जय आनंद महावीर मंडळाच्या टिफीन बनवा स्पर्धेत डॉ पूजा कासवा प्रथम

0
21

नगर – नवीपेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळ आयोजित पौष्टीक शाकाहारी टिफीन बनवा स्पर्धेत डॉ.पूजा अमोल कासवा यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेला गृहिणींचा प्रतिसाद मिळाला. महिलांनी आपल्या पाल्यासह रेसिपीचा फोटो व लिखित रेसिपी पाठवल्या होत्या. रोटरी लब ऑफ प्रियदर्शिनीच्या नूतन अध्यक्ष मिनल बोरा यांच्या हस्ते डॉ.कासवा यांना प्रथम बक्षीस देण्यात आले. यावेळी मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, शरद मुथा, विजय मुथा, मनोज बोरा आदी उपस्थित होते. या स्पर्धेत व्दितीय क्रमांक विभागून प्रियंका सुयोग लुणिया व श्रध्दा विशाल डहाळे, तृतीय क्रमांक विभागून शुभांगी अजय शुल, स्वाती आशिष मुथा, शिल्पा पियुष मुथा तर उत्तेजनार्थ बक्षीस योगिता किरण भागवत, आवृत्ती दिनार कासवा, उषा नितीन शेठीया, वर्षा विशाल गुंदेचा यांना मिळाले आहे.

मखाना पॅनकेस, चना जोर गरम, मूग मेथी डोसा, मोरींगा हर्बल पराठा, जैन क्रन्ची चिल्ला, चपाती मलिदा लाडू, छुपे रुस्तम कॅण्डी, शेपू कटलेट, मिनी पालक ईडली डोसा, सोयाबीन पराठा, रव्याचे अप्पे व नारळाची चटणी अशा रूचकर पौष्टीक रेसिपी स्पर्धकांनी सादर केल्या. यावेळी मंडळातर्फे रोटरी प्रियदर्शिनीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मिनल बोरा यांचा सत्कार करण्यात आला. मिनल बोरा म्हणाल्या, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जय आनंद महावीर युवक मंडळातर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. मुलांसाठी त्यांच्या आवडीचे चविष्ट आणि पोषक जेवण बनवताना कसरत करावी लागते. मात्र या स्पर्धेतून आलेल्या रेसिपी पाहिल्यावर महिलांच्या पाककौशल्याचे कौतुक वाटते. आपल्या पाककृतीचे झालेले कौतुक महिलांसाठी नेहमीच आनंददायी असते.

मंडळाने केलेला सत्कार समाजासाठी काम करताना मोठी प्रेरणा देईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. स्वागत करताना आनंद मुथा म्हणाले, सध्याच्या काळात जंक फूड, फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: लहान मुलांना ते खूप आवडते. परंतु, त्यातून शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाही. अशावेळी घरीच चमचमीत आणि पौष्टिक डबा करून मिळाला तर मुले तो आवडीने खातात. या स्पर्धेत अशाच अतिशय चांगल्या रेसिपी सादर करण्यात आल्या. सर्व स्पर्धकांच्या रेसीपी उत्कृष्ट होत्या. सर्व स्पर्धकांना मंडळाने आकर्षक गिफ्ट दिले आहे. मंडळाच्यावतीने भविष्यातही अशा विविध स्पर्धा घेण्यात येतील. डॉ.पूजा कासवा म्हणाल्या, टिफिन बनवा स्पर्धेची माहिती कळताच लगेचच यात सहभागी होण्याचे ठरवले. जय आनंद महावीर युवक मंडळाच्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे महिलांना आपली ओळख सिध्द करण्याची संधी मिळत असते. शरद मुथा यांनी आभार मानले. बक्षिसे मिळालेल्या संबंधितांनी आपली बक्षिसे ओळखपत्र दाखवून रोहित कॉस्मेटिक, नवी पेठ येथून घेऊन जावी असे आवाहन करण्यात आले आहे.