अपघाताला आमंत्रण देणाऱ्या भिंगार येथील खड्डेमय राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती करावी

0
56

एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये; भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन

नगर – भिंगार शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या दुरावस्थेमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, पावसाळ्यात यामध्ये आणखी भर पडून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नी भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशन रोड येथील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास भेट देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे व नवीन रस्त्याचे काम हाती घेण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अभियंता दि.ना. तारडे यांना देण्यात आले. याप्रसंगी भिंगार राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शिवम भंडारी, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, विशाल (अण्णा) बेलपवार, अभिजीत सपकाळ, सागर चवंडके, दिनेश लंगोटे, प्रवीण घावरी, विशाल राहिंज, शैलेश हिकरे, प्रवीण घावरी, विजय नामदे, कम लेश राऊत, अनिल तेजी, मतीन शेख, दीपक लिपाणे, अक्षय नागापुरे, अजिंय भिंगारदिवे आदी उपस्थित होते. भिंगार परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ६१ ची अतिशय दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झालेले असून, अतिशय महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता असल्याने खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे.

नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरुन जावे लागत आहे. मागील काळात निवेदन दिल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र सदरची रस्ता दुरुस्ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने रस्त्यावर पुन्हा खड्डेच खड्डे झाले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. भिंगार येथील नागरिकांच्या दृष्टीने महामार्ग क्रमांक ६१ च्या दुरुस्ती हा जिव्हाळ्याचा प्रश्न असून, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या पावसाळ्याच्या दिवस असून, भिंगार येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. खड्डयात पावसाचे पाणी साचून, त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहे. या रस्त्यावर मोठ्या वाहनांची देखील नेहमीच वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने या खड्डेमय रस्त्यावर एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहू नये, तर तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. या रस्त्यामुळे भिंगारकरांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, सदर रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवम भंडारी यांनी दिला आहे.