पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल प्रा. विजय संसारे व प्रा.प्रदीप जारे यांचा सीएसआरडी महाविद्यालयात सन्मान

0
23

नगर – येथील बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी महाविद्यालयाचे प्रा. विजय संसारे व प्रा. प्रदीप जारे यांनी पीएचडी अभ्यासक्रम देशपातळीवरील नामांकित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथून पूर्ण केल्याबद्दल सीएसआरडी महाविद्यालामार्फत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते या दोन्ही प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास डॉ.सुरेश मुगुटमल, डॉ. जेमोन वर्गीस, सॅम्युअल वाघमारे, विकास कांबळे, शरद गुंडरस, गिरीश शिरसाठ, किरण गीते, नाजीम बागवान, अमित सिंग यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. पठारे म्हणाले कि, या दोन्ही प्राध्यापकांच्या यशामुळे सीएसआरडी महाविद्यालयात तज्ञ प्राध्यापकांच्या संख्येत भर पडली आहे. संस्थेच्या दृष्टीने ही गौरवाची बाब असल्याच्या मत त्यांनी व्यक्त केले. या दोन्ही प्राध्यापकांनी आपल्या संशोधनातून समाजकार्य शिक्षण क्षेत्राला महत्वपूर्ण योगदान दिले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांनी देखील त्यांच्या या यशाचे स्वागत केले आहे व त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. विजय संसारे यांचे पीएचडी संशोधन ’समाजकार्याच्या विद्यार्थ्यांमधील जीवन कौशल्यांचा विकास’ या विषयावर आधारित होते. या संशोधनात त्यांनी महाराष्ट्रातील समाजकार्य विद्यार्थ्यांमधील जीवन कौशल्यांचा उपयोग व विकास यावर सखोल अभ्यास केला.

समाजकार्यातील विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये कशी विकसित होतात आणि शैक्षणिक पद्धतींद्वारे ही कौशल्ये कशी वाढवता येतील, याविषयी त्यांनी विस्तृतपणे संशोधन केले. या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षांमुळे अभ्यासक्रमाची रचना, अध्यापन पद्धती आणि सहाय्यक सेवांची नवीन दिशा मिळू शकते, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक भूमिकांसाठी उत्तम प्रकारे तयार करता येईल. जीवन कौशल्यामुळे मानसिकता अधिक प्रगल्भ बनते व विद्यार्थ्यांना सामाजिक प्रश्न अधिक परिणामकारक रित्या हाताळता येतात हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य निष्कर्ष होता. प्रा. प्रदीप जारे यांचे पीएचडी संशोधन ’सामाजकार्य व्यवसाय आणि जात प्रश्न: महाराष्ट्रातील सामाजकार्य अभ्यासक्रम, पद्धती आणि कृतींचा संशोधनात्मक अभ्यास’ या विषयावर आधारित होते. या संशोधनात त्यांनी समाजकार्य शिक्षण आणि अभ्यासामध्ये जातीच्या प्रश्नांचे प्रतिबिंब कसे दिसते, याचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी त्यांनी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांम धील समाजकार्य शिक्षक आणि जातीच्या प्रश्नांवर काम करणार्‍या समाजकार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. भारतीय समाजव्यवस्था व सामजिक प्रश्नांचे मूळ जातीवर आधारित असल्या कारणाने जातीव्यवस्थेचे वेगवेगळे पैलू समाजकार्य शिक्षण अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी असणे गरजेचे आहे असा ठळक निष्कर्ष या संशोधनातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.