शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे

0
17

नगर – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज वाटप केलेले आहे. ते शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे अशी मागणी नगर व श्रीगोंदा विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी घनश्याम शेलार, जयंत वाघ, अरुण म्हस्के, भरत बोडखे, केशव झेंडे, संतोष कुधांडे, शरद पवार आदी पदधिकारी उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की गतवर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. शासनाने मंडलनिहाय अभ्यास करुन शासन निर्णय क्रमांक एस सी बाय २०२३ प्र.क्र. ३७ में ७ दिनांक १० नोव्हेंबर २०२३ नुसार दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे.

जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे काँग्रेसची मागणी

गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातली पीक येऊ शकली नाहीत म्हणून त्यांच्या हातात कुठले उत्पन्न आले नाही त्यामुळे शेतकरी कर्ज भरु शकलेले नाहीत व कर्ज भरु शकणार नाहीत शेतकर्‍यांनी कर्जाचे पैसे भरले नाहीत तर ते ३० जून २०२४ ला थकबाकीत जाणार आहेत, त्यामुळे त्यांना नाहक व्याजाचा भुर्दंड बसेल तर नव्याने कर्ज उपलब्ध होणार नाही त्या कारणाने शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडेल. यावर्षी पर्जन्यमान बरे झालेले असल्याने कर्ज उपलब्ध न झाल्यास शेती व्यवसाय करणे कठीण जाईल जर शासन निर्णयाप्रमाणे आपल्या बँकेने शेतकर्‍याच्या कर्जाचे पूर्णपुनर्गठन केले तर शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळून त्यांना नवीन कर्ज उपलब्ध होईल व त्यांना शेती व्यावसाय करणे सुकर होईल त्यासाठी कर्जाच्या पुनर्गठणचा निर्णय होणे नितांत गरजेचे आहे. तरी मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करून शेतकर्‍यांच्या कर्जाचे शासन निर्णयानुसार त्वरित पुनर्गठण करावे असे निवेदनात म्हटले आहे.