‘आप’च्या जिल्हाध्यक्षांना रस्त्यात अडवून लुटले

0
44

 

धक्काबुक्की करून रोकड घेतली काढून, चौघांवर गुन्हा दाखल

नगर – वाहनाला कट मारून नुकसान केल्याचा आरोप करत धक्काबुक्की करून आम आदमी पक्षाचे (आप) नगर जिल्हाध्यक्ष राजू सुर्यभान आघाव (वय ५३, रा. खेडले परमानंद, ता. नेवासा) यांना लुटले सावेडी उपनगरातील गुलमोहोर रस्त्यावर सुरभी हॉस्पिटलजवळ ही घटना घडली. या प्रकरणी आघाव यांनी मंगळवारी (दि.२५) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरूध्द सामुहिक जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष आघाव हे रविवारी (दि.२३) नगर शहरात आले होते. ते दुपारी सावेडी उपनगरातील गुलमोहोर रस्त्यावरून जात असताना साडेबाराच्या सुमारास सुरभी हॉस्पिटलजवळ त्यांच्या वाहनाला पाठीमागून आलेल्या वाहन चालकाने वाहन आडवे लावले. त्या वाहनातून चौघे उतरले व ते आघाव यांना म्हणाले, ‘तु आमच्या गाडीला कट मारून गाडीचे नुकसान केले आहे’.

त्यावरून त्यांच्यात वाद झाले व त्या चौघांनी आघाव यांना शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. त्यांच्या शर्ट व पॅन्टच्या खिशातील सुमारे १८ ते १९ हजार रूपयांची रोख रक्कम दमदाटी करून काढून घेतली. फोन पे अ‍ॅतपव्दारे दोन वेळेस एक एक हजार असे दोन हजार रूपये ऑनलाईन घेतले व तेथून निघून गेले. दरम्यान, सदरचा प्रकार रविवारी घडला असून आघाव यांनी मंगळवारी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.