मृत झाल्याच्या संशयावरून सोलापूर रोडजवळ नेवून टाकले
नगर – सारसनगर परिसरात असलेल्या औसरकर मळा येथे २५ जून रोजी एकाला झाडाला बांधून लाकडी दांडयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बेदम मारहाणी मुळे तो बेशुद्ध झाल्याने तो मृत झाल्याचा समज करून घेत त्याला सोलापूर रोड परिसरात नेवून टाकण्यात आले. या प्रकरणी ५ जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत राजु हिरा घोष (वय ३२, रा. शंकरकला, जि. मालदा, पश्चिम बंगाल) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याला मारहाण करणारे किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, ऋतिक बाबासाहेब पुंड (सर्व रा. औसरकर मळा, सारसनगर, अहमदनगर) यांच्याविरुद्ध भादवि. कलम ३०७, ३२६, ३२४, ३२३, ३४२, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोहेकॉ. पांडुरंग आश्रुबा बारगजे यांनी फिर्याद दिली आहे. मारहाणीची घटना २५ जून रोजी सायंकाळी ६ ते ६.४५ वाजण्याच्या दरम्यान औसरकर मळा येथे घडली.
परप्रांतीय असलेला राजु हिरा घोष हा किरण भगवान औसरकर यांच्या घरात चोरी करण्याचे उद्देशाने गेल्याचा संशय आल्याने त्यास किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, ऋतिक बाबासाहेब पुंड यांनी पकडुन घराजवळील झाडाजवळ घेवून जाऊन त्याचे हातापाय दोरीने बांधले. नंतर त्याला झाडाला दोरीने बांधुन लाकडी दांडयाने व लाथाबुयाने हातापायावर, पोटावर व चेहर्यावर जिवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीमुळे तो बेशुद्ध झाला. त्यामुळे तो मृत झाल्याचा समज करून त्याला सोलापूर रोड परिसरात टाकण्यात आले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर ही घटना समोर आली. त्यानंतर जखमी घोष याचा जबाब पोलिसांनी घेतला. त्यानंतर २६ जूनला दुपारी संबधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल भारती भिंगार कॅम्पचे सपोनि.योगेश राजगुरू यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस केली.