चाँदबिबी महाल परिसराजवळ विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

0
28

नगर – नगर तालुयातील खांडके गावात रविवारी (दि.२३) सायंकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह शेतातील विहिरीत बुधवारी (दि.२६) सकाळी आढळून आला आहे. सागर पिराजी ठोंबे (वय २८, रा.ठोंबे वस्ती, खांडके, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत सागर हा अविवाहित होता. तो बिगारी काम करत होता. कामानिमित्त तो कधी कधी २-३ दिवस बाहेर गावी राहत असे त्यामुळे रविवारी (दि. २३) सायंकाळी तो घरी आला नाही तरी त्याच्या कुटुंबीयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

३ दिवसानंतर बुधवारी (दि.२६) सकाळी ठोंबे वस्ती येथील शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या घराकडे जाणारा रस्ता हा विहिरी जवळूनच जात असल्याने तो पाय घसरून विहिरीत पडला असावा आणि पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तो मयत झाला असावा असा त्याच्या कुटुंबियांचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार शैलेश सरोदे हे करीत आहेत.