बांधकाम कामगारांची नोंदणी न करणार्‍या अधिकार्‍यांविरोधात ‘जिल्हाव्यापी आंदोलन’

0
44

नगर – सर्वसामान्य कामगार शासकीय कल्याणकारी योजनांपासून लांब आहेत. बांधकाम कामगारांची नोंदणी न करता उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या अधिकारी विरोधात जिल्हाव्यापी आंदोलन केले जाणार आहे.कामगारांमध्ये एकजुट नसल्याने त्यांचा फक्त मतांसाठी वापर केला जात आहे. कामगारांचे लोकप्रतिनिधित्व करणारे नेते नसल्याने फक्त भांडवलदारांचा विचार केला जात असून, सर्वसामान्य कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी व कामगारांची एकजुट करण्याच्या उद्देशाने संघटना प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन लोकशाही बांधकाम कामगार संघटना व इतर कामगार संघटनांचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव भैलुमे यांनी केले. लोकशाही बांधकाम कामगार संघटना व इतर कामगार संघटनेची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी श्री. भैलुमे बोलत होते. यावेळी निसारभाई शेख, सचिन दोशी, सुनिता सरोदे, राणी घोडके, मंगल पाखरे, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते. पुढे श्री.भैलुमे म्हणाले की, बांधकाम कामगार व इतर असंघटित कामगारांचे आरोग्य, मुलांचे उच्च शिक्षण, दारिद्रय व रोजगाराचे प्रश्न दिवसंदिवस बिकट बनत चालले आहे. महागाईच्या काळात कामगारांना जीवन जगणे असह्य झाले आहे. कामगार हितासाठी सर्व असंघटित कामगारांना एकत्र येऊन न्याय, हक्कासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीत संघटनेच्या जिल्हा प्रभारीपदी संगीता बोकारे, जिल्हाध्यक्षपदी राणीताई जाधव यांची निवड करण्यात आली.

जिल्हा प्रभारीपदी संगीता बोकारे तर जिल्हाध्यक्षपदी राणीताई जाधव यांची निवड

तर श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी सुभाष शिंदे, श्रीगोंदा महिला तालुका अध्यक्षपदी मंगल पाखरे व राणी घोडके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर बांधकाम कामगारांचे दहा ते बारा हजार अर्ज जाचक अटी लावून नोंदणी अधिकार्‍यांनी ना मंजूर केले आहेत. कष्टकरी बांधकाम कामगारांना सहकार्य न करणार्‍या अधिकार्‍यांची बदली होण्यासाठी लवकरच आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. अशिक्षित असलेल्या बांधकाम कामगारांना अर्ज कसे भरावे याची माहिती दिली जात नाही, मुलांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज देखील लवकर मंजूर होत नसल्याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकारी यांना भैलुमे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.