नगर शहरातील काही भागात नळामधून येतेयं ‘गढूळ पाणी’

0
32

नगर – ड्रेनेज लाईनचे चोकअप काढण्यासाठी सध्या शहरात ठिकठिकाणी खोदाईचे काम केले जात आहे. तथापि हे खोदलेले खड्डे अनेक दिवस बुजविले जात नसल्याने या ड्रेनेजमधील मैलामिश्रीत घाण पाणी नळांना येत असून या दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असून ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने चोकअप काढण्यासाठी ड्रेनेज लाईन खोदली जाते. परंतु चोकअप काढल्यानंतर लगेचच सदर खड्डा बुजविला जात नाही. शहरातील नालबंद खुंट येथे मागील १५ दिवसांपासून ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डा खोदण्यात आला आहे. मात्र सदरचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने परिसरातील नळांना मैलामिश्रीत घाण पाण्याचा पुरवठा होत आहे. नालबंद खुंट, बाबा बंगाली, हातमपुरा, खिस्तगल्ली या परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.

वारंवारच्या खोदाईमुळे ड्रेनेज लाईनसह रस्त्यांचीही दूरवस्था 

ड्रेनेज लाईनचे चोकअप खोदलेले खड्डे रहदारीला अडथळे ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडू शकतात. चोकअप झालेल्या ड्रेनेजमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नव्याने केलेले रस्ते ड्रेनेज चोकअपमुळे वारंवार खोदून त्यांची दुरावस्था केली जात आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नळावाटे येणारे ड्रेनेजचे घाण पाणी बंद करावे तसेच ड्रेनेज लाईनचे खोदलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी होत आहे.