तुंबलेली गटार, साचलेले पाणी, दुर्गंधी, पडलेले ओटे, मोकाट जनावरे, उंदीर, घुशीचा मुक्त संचार
नगर- शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंज बाजारातील महात्मा फुले भाजी मार्केटची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे. सर्वत्र पसरलेली अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होऊन बाजारपेठेतील नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. महापालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींचे या भाजी मार्केटकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने भाजी विक्रेते व्यवसायिक आणि नागरिक नरकयातना भोगत आहेत. गंज बाजार भाजी मार्केटला सध्या मोठी अवकळा आली असून, मार्केटमधील सर्व बाजार ओट्यांची मोठी पडझड झाली आहे. या ओट्यांच्या खाली उंदीर, घुशींनी मोठ-मोठी बिळे केली आहेत.
मार्केटमधील एका बाजूने असलेली गटार नेहमीच तुंबलेली असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. बाजार ओट्यांमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचून राहिले असून दुर्गंधी आणि डासांचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेला आहे. पडलेल्या ओट्यांची, दगड, माती तसेच गटारीतील घाणीचे ठिकठिकाणी ढिगारे पडले आहेत. हे भाजी मार्केट म्हणजे मोकाट जनावरांसाठी नंदनवनच झाले आहे. जनावरांचा मुक्त संचार असल्याने मार्केटमधील रस्ते शेण, मलमूत्राने माखलेले आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये पायी चालणेही कठीण झाले आहे. येथे असणार्या स्वच्छतागृहाची अवस्था तर अत्यंत बिकट आहे. सडलेला भाजीपाला, साचलेले पाणी, तुंबलेली गटार यामुळे सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती कायम राहत असल्याने या भाजी मार्केटला कोणी वाली आहे की नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
गंज बाजार भाजी मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागातून बाजारपेठेत येणारे ग्राहक या भाजी मार्केटमध्ये खरेदीदार आहे. मात्र भाजी मार्केटची मोठी दुरावस्था झाल्याने येथील भाजी, फळे विक्रेते ही मार्केटच्या बाहेर आपली दुकाने थाटत आहेत. विक्रेते व्यावसायिकांबरोबरच ग्राहकांना येथे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच विक्रेते मार्केटमध्ये आपली दुकाने लावत आहेत. गंज बाजारला लागून सोनार बाजार, कापड बाजार आहे. एकाच वेळी सर्व खरेदी होत असल्याने नागरिक या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत असतात. त्यात त्यांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शहरात येऊ की नये? असा सवाल त्यांच्या मनात उपस्थित होतो. शहरातील मुख्य भागातील या गंभीर बाबीकडे नगरसेवक, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पालकमंत्री हे लक्ष देणार का? हा प्रश्नच आहे.
या मार्केटच्या दुरावस्थेमुळे भाजी विक्रेते, फळ विक्रेते व इतर दुकानदार मार्केटच्या रस्त्यावर अतिक्रमण करत आपल्या व्यवसायाच्या गाड्या लावत असल्याने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. बाजारात येणार्या नागरिकांना महिलांना आपले वाहन लावण्यासाठी जागाच मिळत नाही जर थोडीशी जागा कुठे मिळाली तर हे अतिक्रमण धारक त्यांना इथे गाडी लावू नका किंवा गाडी लावून देत नाही यावरून अनेक वेळा वाद विवाद होतात या अतिक्रमणाच्या गंभीर बाबीकडे महापालिका लक्ष देऊन कारवाई करणार का? गुदमरलेल्या रस्त्याचा श्वास मोकळा करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.