नगर – अखिल भारतीय कामगार सेना व एमआयडीसी येथील आयकॉन मोल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्यात नुकताच करार होऊन, कर्मचार्यांना ७ हजार रुपयांची पगारवाढ देण्यात आली. त्याचबरोबर काम गारांना बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, पगारी रजा व सुट्ट्या व कामगार कायद्याप्रमाणे इतर लाभ नवीन करारानुसार मिळणार आहे. हा करार १ एप्रिल २०२४ पासून ते ३१ मार्च २०२७ पर्यंत तीन वर्षासाठी करण्यात आला आहे. १५ ते १६ वर्षापासून करार न झाल्याने मागील काही वर्षापासून अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरु होता. अखिल भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस राजेश पाटील व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापनासह बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या कराराने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वेतनवाढीच्या करारावर कामगार युनियनच्या वतीने राजेश पाटील, भाऊसाहेब उनवणे, कामगार प्रतिनिधी आनंद बारस्कर, नितीन उजागरे, युनिट अध्यक्ष एडकेताई यांचे तर कंपनी व्यवस्थापनातर्फे संचालक बिजल शेठ यांनी सह्या केल्या.
अखिल भारतीय कामगार सेना व आयकॉन मोल्डर्समध्ये करार : बक्षीस, बोनस, वार्षिक सहल, पगारी रजा व सुट्ट्यांचा कामगारांना मिळणार लाभ
यावेळी कामगार संदीप निमसे, नितीन उजागरे, आनंद बारस्कर, अशोक सबीन, संजय नरसाळे, मयूर बारस्कर, शिवाजी दरेकर आदी उपस्थित होते. कंपनीचे बिजल शेठ यांनी कंपनीतील कामगारांना भरीव पगारवाढ देण्यात आली आहे. तसेच कामगार कायद्यांचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे. कर्मचार्यांना १ एप्रिल २०२३ पासून फरकाची रक्कम देखील लवकरच अदा केली जाणार असून, युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे अत्यंत सौजन्याचे नाते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाऊसाहेब उनवणे म्हणाले की, कंपनीतील कामगारांना महागाईच्या काळात सन्मानाने जगता यावे, यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा करुन त्यांचा वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. यासाठी संघर्षाची वेळ न येता, कंपनीकडूनही मोठे सहकार्य मिळाले. या करारामुळे कामगार व कंपनीचे आणखी चांगले भावनिक नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. युनिट अध्यक्षा एडकेताई यांनी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना पगारवाढ शय झाली असून, युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.