दुचाकीवरून जाणार्‍या महिलेचे मंगळसूत्र हिसका मारून लांबवले

0
25

गुलमोहर रोडवरील घटना; अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

नगर – दुचाकीवरून जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील डायमंडचे ७ पेंडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हिसका मारून तोडून पळवून नेले आहे. सोमवारी (दि.२४) दुपारी १२.३० च्या सुमारास सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्वप्नाली राहुल वाळके (वय ३२, रा. ओम साई कॉम्प्लेस, काकासाहेब म्हस्के कॉलेज रोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाळके या त्यांच्या लहान मुलाला शाळेतून घेवून दुपारी १२.३० च्या सुमारास गुलमोहर रोड कडून प्रोफेसर कॉलनी चौकाकडे त्याच्या मोपेड वर चाललेल्या होत्या.

त्यावेळी त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकल वर २ अनोळखी इसम आले. त्यांनी मोटारसायकल फिर्यादी वाळके यांच्या जवळ आणली आणि मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडले. काही क्षणातच दोघेही भरधाव वेगात तेथून पसार झाले. फिर्यादी वाळके यांनी आरडाओरडा केला. मात्र परिसरातील नागरिक जमा होई पर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. त्यानंतर वाळके यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.