मोटारसायकलस्वाराला भरदिवसा रस्त्यात अडवून लुटले; गुन्हा दाखल

0
34

नगर – मोटारसायकल वर चाललेल्या दोघांना भरदिवसा रस्त्यात अडवून तू माझ्या गाडीला कट का मारला अशी विचारणा करत दमबाजी करून त्याच्या खिशातून २० हजारांची रोकड बळजबरीने काढुन घेतल्याची घटना नगर पाथर्डी रोड वर बाराबाभळी गावाजवळील पुलावर सोमवारी (दि.२४) दुपारी १ च्या सुमारास घडली. याबाबत भगवान उत्तम खाडे (वय ४६, रा. पेठ पांगरा, ता.आष्टी, जि.बीड) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा एक सहकारी असे दोघे त्यांच्या मोटारसायकल वर पाथर्डी कडून नगरकडे येत होते.

बाराबाभळी गावाजवळ असलेल्या पुलावर त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या मोटारसायकलला त्याची मोटारसायकल आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर तुम्ही मला कट का मारला म्हणत शिवीगाळ व दमबाजी सुरु केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या खिशात हात घालत त्यांच्या खिशातून २० हजारांची रोकड काढुन घेतली व दमबाजी करत तेथून निघून गेला. ही घटना फिर्यादी खाडे यांनी भिंगार पोलिसांना सांगितली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध भा.दं. वि. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.