जिल्हाधिकारी यांना सवाल
नगर – या ना त्या कारणांनी वाडिया पार्क मैदान नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहे अनेक खडतर प्रवासाचा सामना करत खेळाडूंसाठी अहमदनगरचे वाडीया पार्क मैदान मोठ्या थाटामाटात उभे राहिले खरे तर ऐतिहासिक वारसा या मैदानास लाभलेला आहे. हे मैदान अनेक दिवसापासूनचे आहे. या मैदानावर सराव करून अहमदनगरच्या अनेक खेळाडूंनी देशाच्या नकाशावर नाव कोरलेले आहे. अनेक दिग्गज रणजीपटू घडविलेले आहेत. नामांकित असे क्रिकेटचे कपिल देव, सुनील गावस्कर असे खेळाडू अहमदनगरच्या याच मैदानावर खेळले आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून वाडिया पार्क काही ना काही कारणास्तव नेहमीच चर्चेत येत आहे. येथील अधिकार्यांना याचे मात्र काही देणे घेणे दिसत नाही. जलतरण तलावाचा विषय असो वा खेळाडूंना देण्यात येणार्या सुविधांचा विषय असो कधी हॉलीबॉल, बास्केटबॉलचे ग्राउंड विषय असो या सर्वांसाठी क्रीडा कार्यालयाच्या वतीने देण्यात येणार्या सुविधांची वनवा दिसून येत आहे. वेगवेगळ्या खेळांना जागेचा वानवा एकाच पोर्ट वर तर तीन तीन खेळांचे प्रशिक्षक प्रशिक्षण देतात, आता तर चक्क ऐन पोलीस भरतीच्या वेळेसच या ठिकाणी सरावासाठी अनेक खेळाडू मोबाईलच्या टॉर्च लाईटमध्ये सराव करत आहेत ही खरच नगरकरांसाठी शर्मेची बाब आहे.
जिल्हाधिकारी साहेब ! आपणच या मैदानाला एकदा समक्ष भेट देऊन पाहणी करून गेलात तर या मैदानाची खरी परिस्थिती आपल्या निश्चितच लक्षात येईल या ठिकाणी मैदानाच्या गोलाकार बाजूने लावले ते पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत फक्त आणि फक्त अधिकार्यांच्या इमारतीवरच मैदानाच्या समोरच्या बाजूने दोन दिवे नव्हे टेंभे लावल्यागत आपला जीव ओतून प्रकाश सर्व मैदानावर टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे या ठिकाणी दिसून येईल. हो पण शर्त एकच असेल ही भेट संध्याकाळी दिली तरच आपणास हे सर्व दिसेल बर का ? या ठिकाणी संध्याकाळी आपण आलात तर सर्व चित्र स्पष्ट होईल. आपण सामितीचे अध्यक्ष आहात या नात्यानेच खेळाडूंचे भवितव्य घडविणारे वाडीया पार्क मैदान असे किती दिवस अंधारात ठेवणार आहात हा प्रश्न आता मैदानावर येणारे खेळाडू आपणाला विचारत आहेत.