विजेच्या खांबावरून पडून खाजगी वायरमनचा मृत्यू

0
72

नगर – बल्ब बसविण्यासाठी विजेच्या खांबावर चढलेला असताना तोल गेल्याने खांबावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या खाजगी वायरमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नगर तालुयातील केतकी, निंबोडी गावच्या परिसरात घडली आहे. सुनील रमेश साठे (वय २९, रा. केतकी, निंबोडी, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. मयत वायरमन साठे हा गावातील विजेच्या खांबावर बल्ब बसविण्यासाठी शनिवारी (दि.२२) दुपारी १२ च्या सुमारास चढला होता. मात्र बल्ब बसवत असताना त्याचा तोल गेल्याने तो उंचावरून खाली जमिनीवर पडला.

त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना रविवारी पहाटे २.३५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.