महेश सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर कार्यक्रमानुसार सुरू राहणार

0
77

सहकारी संस्थांच्या निवडणूक स्थगिती आदेशात सुधारणा

नगर – राज्य सरकारने पावसाळ्याचे कारण पुढे करत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकल्या आहेत. तथापी निवडणुकांना स्थगिती देण्याच्या आदेशात पुन्हा एकदा सुधारणा करत ज्या संस्थांच्या निवडणुका उमेदवारी अर्ज विक्री आणि स्विकृती या टप्प्यावर आहेत किंवा त्यापुढच्या टप्प्यावर आहेत अशा संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्यास या सुधारित आदेशाद्वारे परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक घोषित कार्यक्रमानुसार पूर्ण केली जाणार आहे. राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करत तीन महिने लांबणीवर टाकल्या होत्या. त्यानुसार या संस्थांच्या निवडणुका आहे त्याच टप्प्यावर ३० में पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

१ जूनपासून निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. तथापी पावसाळ्याचे दिवस विचारात घेऊन राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आहे त्याच टप्प्यावर स्थगिती देत निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तथापी सदर आदेशात पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली असून ज्या संस्थांच्या निवडणुकांचा अर्ज विक्री-स्विकृती अथवा त्यापुढील टप्पा चालू आहे अशा संस्थांच्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार भिंगारच्या महेश नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक घोषित कार्यक्रमानुसार सुरू राहणार आहे. सध्या या पतसंस्थेचा उमेदवारी अर्ज माघारीचा टप्पा सुरू असून, अर्ज माघारीसाठी २७ जून ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे या संस्थेच्या संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी होत असलेली निवडणूक नियमित टप्प्यानुसार सुरू राहणार असून, ७ जुलै रोजी मतदान व मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अल्ताफ शेख यांनी दिली आहे.