नगर – चांदबीबी महालाजवळ नगर तालुयातील जांब गावच्या शिवारात शेतकर्याचे घर भरदिवसा फोडून ५ लाख ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेणार्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून चोरीतील १ लाख ५ हजाराचे सोने, १० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. जांब येथील दत्तात्रय आसाराम पवार हे कुटूंबियांसह घराचे पाठीमागील शेतात काम करत असताना चोरट्यांनी त्याचे घर फोडून चोरी केली होती. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार पो. नि. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, मेघराज कोल्हे व अरुण मोरे यांचे पथक नेमून तपास सुरु केला.
चोरीतील १ लाख ५ हजाराचे सोने, १० हजारांची रोकड केली हस्तगत
पो. नि.आहेर यांना रविवारी गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी तुषार हबाजी भोसले व कानिफ उध्दव काळे (दोन्ही रा. आष्टी, जिल्हा बीड) यांनी केला असून ते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी मुट्ठी चौक, नगर-जामखेड रोड येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने. पो.नि. आहेर यांनी तत्काळ कारवाई साठी पथक पाठविले. या पथकाने सापळा लावुन दोघांना पकडले. त्यांची अंगझडती घेता त्यांच्याकडे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व १० हजारांची रोकड असा १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तो ताब्यात घेवून विचारपूस केली असता सदर मुद्देमाल हा जांब येथून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. आरोपी तुषार भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नगर जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण २३ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी कानिफ काळे याचे विरुद्ध नगर व बीड जिल्ह्यात दरोडा तयारी, दरोडा व खुन असे गंभीर स्वरुपाचे एकुण ३ गुन्हे दाखल आहेत.