
जमात-ए-इस्लामी हिंदचे नगरमध्ये उपक्रम
नगर – रमजान काळात जमा होणारी जकात व दानशूर लोकांनी दिलेल्या देणगीतून नगरमधील ७२ विधवा महिलांना दर महिन्याला दोन हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना अभ्यासिका व तज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे उपलब्ध करून दिले जाते. नगरच्या जमाते इस्लामी हिंद संस्थेचे हे कार्य विविध सामाजिक संस्थांना दिशादर्शक मानले जात आहे. एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या जमाते इस्लामी हिंद या संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त रविवारी मशीद परिचय उपक्रम येथील कासिमखानी मशिदीत घेण्यात आला. ही पाचशे वर्षांपूर्वी स्थापन झालेली ऐतिहासिक वास्तू आहे. येथे झालेल्या मशीद परिचय कार्यक्रमात जमाते इस्लामी हिंदचे स्थानिक अध्यक्ष प्रा. शेख मुस्ताक उमेर यांच्यासह मुस्ताक पठाण, डॉ. इकराम खान काटेवाला, मुस्तकीन पठाण, नदीम शेख, मुबीन खान आदींनी कासिम खानी मशीद व जमाते इस्लामी हिंदच्या नगर शाखेद्वारे राबवल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी पत्रकार रामदास ढमाले यांच्यासह श्रीराम जोशी, नितीन पोटलाशेरू, मोहिनीराज लहाडे, विठ्ठल लांडगे, बबन मेहेत्रे, गणेश देलमाडे, दीपक कांबळे, रामदास बेद्रे, समीर मन्यार, बबलू शेख, रवी कदम, गोरक्षनाथ बांदल आदी उपस्थित होते. अध्यात्म, आंतरधर्मीय समजूतदारपणा, संशोधन आणि शिक्षण, सामाजिक विकास, धोरणात्मक मुद्दे, मूल्य आधारित राजकारण, न्यायाधारीत अर्थव्यवस्था आदीसंदर्भात जमाते इस्लामी हिंदद्वारे विविध उपक्रम राबवले जातात. विधवा महिलांना उपजीविकेसाठी आर्थिक मदत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या व वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका व त्यासाठीची आवश्यक पुस्तके तसेच तज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. रमजान मध्ये २०० वर गरीब कुटुंबांना रेशनकिट, गुजरातच्या भूकंपातील आपदग्रस्तांना आवश्यक साहित्य व आर्थिक मदतही दिली आहे. याशिवाय तामिळनाडूतील पूरग्रस्तांनाही मदत पोहोचवली गेली आहे. शिक्षण व वैद्यकीय मदत गरजवंतांपर्यंत पोहोचवणे आणि सरकारद्वारे गरिबांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आदी उपक्रम येथे राबविले जातात, असे यावेळी सांगण्यात आले. प्रारंभी मौलाना मोहम्मद अरीफ यांनी पवित्र कुराण पठण केले. मशिद परिचय उपक्रमाचे पत्रकारांनी कौतुक केले व समाजातील सर्व घटकांसाठी असे उपक्रम दिशादर्शक असल्याचे आवर्जून सांगितले.
अकारण भीती व अपरिचितपणा
समाजामध्ये एकमेकांविषयी अकारण भीती व अपरिचितपणा वाढल्याने काहीसे अविश्वासाचे वातावरण दिसत आहे. मात्र, प्रत्येक धर्म मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देतो. त्याचे पालन प्रत्येक नागरिकांनी केले पाहिजे, असे आवाहन डॉ. इकराम खान काटेवाला यांनी यावेळी केले. मशीद ही ईश्वरासमोर नतमस्तक होण्याची जागा आहे, त्यामुळे तिच्याविषयी गैरसमज न बाळगता ती पाहण्यासाठी हिंदूंना बोलावले जावे तसेच संक्रात-दिवाळीसारख्या सणात मुस्लिमांना सहभागी करवून घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमातून सामाजिक सलोखा व बंधुभाव वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला