नगर – वाहनातून दोन पेट्या (६० पाकीट) कांदा बियाणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याच्या दोन घटना नगर शहरात मार्केट यार्ड परिसरात घडल्या आहेत. एकूण ५८ हजार ५०० रुपये किमतीचे हे कांदा बियाणे होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अरबाज निसार शेख (वय २६ रा. गाझीनगर, काटवन खंडोबा, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.२१) दुपारी शेख यांनी त्यांच्या ताब्यातील टेम्पो माळीवाडा भागातील वसंत टॉकीज रस्त्यावर अरिहंत ड्रायफ्रूट दुकानासमोर उभा केला होता. ४:४० ते ४:५० दरम्यान अज्ञात चोरट्याने टेम्पोतून २८ हजार ५०० रुपये किमतीची येलोरो कंपनीची कांदा बियाणे पेटी चोरून नेली. त्यामध्ये ३० पाकीट बियाणे होते. याप्रकरणी शेख यांनी शनिवारी (दि.२२) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश सुखदेव दळवी (वय ३५ रा. म्हसणे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी यांनी शनिवारी सायंकाळी मार्केटयार्ड येथे त्यांच्या ताब्यातील वाहन (एमएच १६ सीसी ४७२८) पार्क करून बावीस्कर टेनोलॉजी, मार्केटयार्ड येथील कृषी सेवा केंद्रात ऑर्डप्रमाणे कृषी माल ताब्यात घेण्यासाठी गेले असता सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने वाहनातून ३० हजार रुपये किमतीची येलोरो कंपनीची कांदा बियाणे पेटी चोरून नेली. त्यामध्ये ३० पाकीट बियाणे होते. याप्रकरणी दळवी यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गातून फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही गुन्हे दाखल करत चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.