नगर – पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व संगीत दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे धडे देऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील योगाचे विविध आसने उत्तमपणे सादर केले. योगशास्त्र अभ्यासक चंद्रशेखर सप्तर्षी, योग प्रशिक्षक पूजा ठमके व पोदार स्कूल (पुणे) रिजनल टू चे जनरल मॅनेजर मनोज काळे उपस्थित होते. चंद्रशेखर सप्तर्षी म्हणाले की, योगाभ्यास हा भारताच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. योग-प्राणायामाने मन एकाग्र होते. यामुळे खेळात व अभ्यासात एकाग्रता निर्माण होऊन विद्यार्थ्यांची प्रगती साधली जात असल्याचे सांगितले. पूजा ठमके यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून प्राणायाम, अनुलोम-विलोम, वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, हस्त पादासन, सूर्यनमस्कार अशी विविध आसने करून घेतली. शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप म्हणाले की, योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. मुलांची सर्वांगीन प्रगती होते. मानवी जीवनात व्यायाम व योगाचे अन्ययसाधारण महत्त्व आहे. ज्यामुळे सकारात्मक विचारांचा प्रवाह निर्माण होतो व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. फक्त एक दिवस योगासने न करता योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन केले.
२१ जून हा संगीत दिवसही शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानी विविध प्रकारच्या गाण्यातून, स्वरातून शाळेत स्वरांची मैफल सजली होती. विविध प्रकारच्या भाषेतील गाणी व वाद्य याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केली. संगीत शिक्षक मनोज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वादन व गायनाद्वारे ऑर्केस्टाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पोदार इंटरनॅशनल स्कूलचा आठवा वर्धापन दिन ही साजरा करण्यात आला. शाळेच्या स्थापनेपासूनच्या जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूरजहाँ शेख यांनी केले. आभार पूनम जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.