कंटेनरला पाठीमागून कारही धडकली, चौघे जखमी; अरणगाव-वाळूंज बायपास रोड वरील घटना
नगर – भरधाव वेगातील मालट्रक आणि कंटेनर यांचा समोरासमोर भीषण अपघात होवून यात दोन्ही वाहनांचे चालक जागेवर ठार झाले. तर ट्रक मध्ये चालकाशेजारी बसलेला एकजण केबिन मधून बाहेर फेकला गेल्याने तो सुदैवाने बचावला आहे. तसेच अपघात ग्रस्त कंटेनरला पाठीमागून एक स्विफ्ट डिझायर कारही धडकली असून त्यातील तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. नगर शहराबाहेरील अरणगाव ते वाळूंज बायपास रस्त्यावर शनिवारी (दि.२२) सकाळी ७.३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुब्रमण्यम गोबल (वय ४८, रा. तामिळनाडू) व प्रधान सुरजकरण जाट (वय ३६, रा. अजमेर, राजस्थान) असे या अपघातात मयत झालेल्या वाहनचालकांची नावे आहेत. तर अपघातात बचावलेला कंटेनर मधील लिनर वर नगर मधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारमधील किरकोळ जखमी झालेल्या तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. अपघातग्रस्त कंटेनर हा राजस्थानचा असून तो अरणगाव कडून वाळूंजकडे जात होता. तर तामिळनाडूचा मालट्रक वाळूंज कडून अरणगावच्या दिशेने येत होता. या ठिकाणीच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आलेली होती. त्यामुळे मालट्रक समोरून कंटेनर व जावून धडकला.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातात ट्रकचा आणि कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला. हा अपघात झाल्यावर कंटेनरच्या मागून अरणगाव कडून वाळूंज कडे चाललेली स्विफ्ट डिझायर कारही कंटेनरवर जावून आदळली.त्यात कारचे ही नुकसान झाले. अपघाताच्या वेळी कंटेनर मध्ये बसलेला लिनर केबिन मधून उडून खाली फेकला गेल्याने तो सुदैवाने बचावला असून कंटेनर चालक प्रधान सुरजकरण जाट व ट्रक चालक सुब्रमण्यम गोबल हे दोघेही जागेवरच ठार झाले. याच बायपास रस्त्यावर पोलिस भरती प्रक्रिया सुरु असल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेले नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते, पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांच्या सह पोलिस कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठविले. तसेच क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूला करत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातातील मृतांचे जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नगर तालुका पोलिस ठाण्यात दोघांच्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून दुपारी उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
आंदोलनानंतरही सुरक्षेच्या उपाययोजना नाहीतच
बायपास रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून या रस्त्यावर कुठे चारपदरी तर कुठे २ पदरी वाहतूक सुरु आहे. याबाबत कुठलेही माहिती फलक अथवा वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने केलेल्या नसल्याने या बायपास रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे २ वाहने एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला होता. त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार संस्थेने दिलेल्या आश्वासना प्रमाणे उपाययोजना केलेल्या नाहीत. जर त्या केल्या असत्या तर आज दोघांना जीव गमवावा लागला नसता असे संदेश कार्ले म्हणाले.