नगर – शहरातील पत्रकार चौकातील दुकानात शनिवारी (दि. २२) दुपारी १२ वा.च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचरसह सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून सदरची आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पत्रकार चौकातील कोहिनूर प्लाझा या इमारतीत ‘माय साईन’ हे दुकान आहे. या दुकानास शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असताना अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले.
मनपाच्या अग्नीशामक दलाने विझवली आग, जीवितहानी नाही
महापालिकेचे शहर आणि सावेडी असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच सदरची आग विझविण्यात आली. या आगीत दुकानाचा पुरता कोळसा झाला असून साहित्य जळून खाक झाले. शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली. प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मनपा अग्नीशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखालील टिमने आग तातडीने विझवली. या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.