शेअर ट्रेडिंगमध्ये आणखी एकाची ३६ लाख २३ हजारांची फसवणूक

0
30

नगर – शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर मधील अनेकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर येत असून अशा प्रकारे एकाची तब्बल ३६ लाख २३ हजारांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि.२१) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अशा प्रकारे फसवणुकीचा गेल्या १५ दिवसांतील हा ४ था गुन्हा आहे, तर या दाखल ४ गुन्ह्यातील फसवणूक झालेली रक्कम १ कोटी २९ लाख ४८ हजार एवढी झाली आहे. याबाबत शहाजी तुकाराम गांगर्डे (वय ३५, रा. कोंभळी, ता.कर्जत) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे खाजगी नोकरी करतात. त्यांचा मोबाईल नंबर एल्टास फूड वन टू वन सर्व्हिस नावाच्या एका व्हाटसअप ग्रुप मध्ये सहभागी होता. या ग्रुप च्या अ‍ॅड्मीन असलेल्या व्यक्तीने ग्रुप वर शेअर ट्रेडिंग बाबत माहिती टाकली होती. ती माहिती पाहून फिर्यादी गांगर्डे यांनी त्यांच्याशी संपर्क साधत अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांच्यात वारंवार संपर्क होत राहिला. त्या ग्रुप च्या अ‍ॅड्मीन असलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेअर ट्रेडिंगम ध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून फिर्यादी गांगर्डे यांनी त्याला २२ एप्रिल २०२४ ते ३१ मे २०२४ या कालावधीत एकूण ३६ लाख २३ हजारांची रक्कम ऑनलाईन पाठविली. त्यानंतर त्यांना परताव्याबाबत संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर संपर्कच बंद करत पैसे दिले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शुक्रवारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्ती विरोधात भा. दं. वि. ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेश आहेर हे करत आहेत.

गुन्हे दाखल झाले तपासाचे काय?

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीतून अधिक नफ्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक केल्याचे ४ गुन्हे या पंधरवाड्यात नगर शहरात दाखल झाले आहे. यातील ३ गुन्हे सायबर पोलिस ठाण्यात दाखल झालेले आहेत. तर एक गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. शहरातील व्यावसायिक राजीव अनंत सहस्त्रबुध्दे (वय ५३, रा. सिध्दीविनायक सोसायटी, सावेडी) यांची १५ लाख ५५ हजारांची त्या पाठोपाठ प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा. शिवम विहार, शिंदे मळा, सावेडी) या सेवानिवृत्त व्यक्तीची ६६ लाख ५० हजार रुपयांची संदीप बाबुराव कोठुळे (रा. साखर कारखाना कामगार वसाहत, श्री शिवाजीनगर, राहुरी) यांची ११ लाख २० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यात आता शहाजी तुकाराम गांगर्डे यांच्या ३६ लाख २३ हजारांच्या फसवणुकीची भर पडली आहे. या ४ गुन्ह्यातील फसवणुकीची एकूण रक्कम १ कोटी २९ लाख ४८ हजार एवढी झाली आहे. गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्या गुन्ह्यांच्या तपासाचे काय? असा सवाल आता उपस्थित होवू लागला असून पोलिसांनी या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.